अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील लोकांना मोफत लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण व कापडी मास्कचे वाटप करण्याचे काम जन शिक्षण संस्थान (जे. एस. एस.) रायगड ग्रामस्थानने केले. त्याची दखल घेऊन कौशल्य विकास मंत्रालयाने जे. एस. एस.चा गौरव केला आहे.
जन शिक्षण संस्थान रायगडच्या विद्यार्थी व प्रशिक्षिका यांच्या मदतीने सामाजिक सेवेच्या भावनेने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागात कापडी मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. आजपर्यंत 961 लोकांना कोरोनाजन्य परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच एक लाख 51 हजार 350पेक्षा जास्त लोकांना मोफत कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. या कार्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी कौतुक केले आहे. जे. एस. एस. रायगडच्या माध्यमातून जनसामान्यांत कोरोनापासून बचावासाठी व आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने स्वच्छता व जनजागृतीच्या उद्देशाने जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना व उपस्थित ग्रामस्थांना मोफत लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण व कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.