Breaking News

राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह साता समुद्रापार

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकणार प्रभूरामाची थ्रीडी प्रतिमा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील हिंदू धर्मीय समाजाचे प्रमुख आणि अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीचे अध्यक्ष जगदिश शेहानी यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव येथे साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. ‘पीटीआय’शी बोलताना जगदिश यांनी जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे प्रभूरामाचे मोठे चित्र झळकवले जाणार असल्याची माहिती दिली. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अयोध्येत मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करतील, त्याच दिवशी टाइम्स स्क्वेअरवरील बिलबोर्डवर प्रभूरामाची थ्रीडी प्रतिमा झळकवून सोहळ्याचा आनंद साजरा केला जाणार असल्याचे जगदिश म्हणाले. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याने आम्ही तो अमेरिकेतही साजरा करणार असल्याचे जगदिश यांनी स्पष्ट केले.
टाइम्स स्क्वेअरवरील नॅसडॅकची स्क्रीन काही विशेष दिवसांनिमित्त रोषणाईने सजवली जाते. त्यासाठी स्क्रीन भाड्याने दिली जाते. 17 हजार फूट व वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर प्रभूरामाची प्रतिकृती झळकणार आहे. ही टाइम्स स्क्वेअरवरील सर्वांत स्पष्ट व सर्वाधिक रेझोल्यूनश असणारी एलईडी स्क्रीन आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या स्क्रीनवर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष फोटो व व्हिडीओ दाखवले जातील. यात ‘जय श्रीराम’ असा हिंदी व इंग्रजीतील मजकूर, प्रभूरामाची चित्रे, व्हिडीओ आणि थ्रीडी चित्रेही दाखविली जातील. तसेच मंदिराची रचना, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार्‍या भूमिपूजन सोहळ्याचे फोटोही स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे अयोध्येबरोबरच जगातील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ असणार्‍या टाइम्स स्क्वेअरवरही जय श्रीरामाच्या घोषणा व फोटो पाहायाला मिळणार आहेत.
जगदिश यांच्या माहितीनुसार 5 ऑगस्टला टाइम्स स्क्वेअरवर हिंदू समाजातील नागरिक आनंदोत्सव साजरा करणार आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे जगभरातील हिंदूंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. हा दिवस आम्हाला एवढ्या लवकर पाहायला मिळेल असा विचारही आम्ही सहा वर्षांपूर्वी केला नव्हता, मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाले, अशा शब्दांत जगदिश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply