Breaking News

लॉकडाऊनमध्ये तरुणाचा अनोखा छंद; पनवेलमधील पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्यात कैद

खारघर ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात इच्छा नसतानाही अनेकांना कोरोनाच्या भीतीमुळे घरीच थांबावे लागले, मात्र या वेळी आपला छंद जोपासण्याची सवय काहींना स्वस्थ बसू देत नाही. पनवेलमधील रोडपाली गावातील प्रणव ठाकूर या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिसरातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्‍यात कैद करीत आपला छंद जोपासला आहे. प्रणव तळोजा एमआयडीसी घोट गावात आपल्या भावाच्या मेडिकलमध्ये काम करतो. काम करून फावल्या वेळेत तो फोटोग्राफीचा छंद जोपासतो. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणे ओस पडली होती. ही संधी साधून पनवेल परिसरातील ऐतिहासिक ठिकाणे आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्याचा निश्चय प्रणवने केला. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांच्या काळात प्रणवने पनवेलमधील कर्नाळा किल्ला, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण गावातील वाडा, गाढेश्वर धरण, साई गावाजवळील धबधबा, पांडवकडा धबधबा, प्रबळगड किल्ला, कलावंतीण दुर्ग, मोर्बे धरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची साइट आदी ठिकाणे आपल्या कॅमेर्‍यात कैद केली. पनवेलचे नैसर्गिक सौंदर्य तसेच ऐतिहासिक वास्तू सर्वांसमोर आणण्याच्या उद्देशाने प्रणवने ही फोटोग्राफी केली. प्रणवने आजतागायत राज्यभरातील तब्बल 45 गडकिल्ले ड्रोन कॅमेर्‍यात कैद केले आहेत. गडकिल्ल्याची रचना, त्यांची बांधणी यांसह ऐतिहासिक पुस्तके वाचण्याची प्रणवला आवड आहे. स्वराज्यात किल्ल्याची केलेली बांधणी, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले तत्कालीन तंत्रज्ञान पाहण्याच्या आवडीतून प्रणवला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रणवला प्रसिद्ध छायाचित्रकार व्हायचे आहे. आपल्या कॅमेर्‍याच्या लेन्समधून काढलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचीही प्रणवची इच्छा आहे.

पनवेलची पर्यटनस्थळे व ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य सर्वांसमोर यावे हाच माझा फोटोग्राफीमागील उद्देश आहे. लॉकडाऊनच्या काळात मी फावल्या वेळेत किमान 10 ठिकाणांना भेट देत ड्रोनद्वारे ही छायाचित्रे काढली आहेत. कोणाचीही मदत न घेता एकट्यानेच हे सर्व फोटो मी काढले आहेत. -प्रणव ठाकूर, छायाचित्रकार

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply