
पनवेल ः वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामोठे आणि करंजाडे वसाहतीमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. कामोठ्यात 30 एप्रिल ते 3 मे असे चार दिवस, तर करंजाडेमध्ये 1 व 2 मे तसेच जोपर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तोपर्यंत प्रत्येक आठवड्यातील शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कामोठे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी कामोठे बंदची हाक दिली आहे. या चार दिवसांत फक्त मेडिकल दुकाने आणि हॉस्पिटल चालू राहतील, तर करंजाडे ग्रामपंचायतीच्या वतीने वसाहतीत आठवड्यातील शुक्रवारी आणि शनिवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. हे दोन दिवस ग्रामपंचायत हद्दीतील मेडिकल स्टोअर्स व दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने (व्यवसाय) बंद राहतील, तर दुध डेअरी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.