महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या लहान बालकांवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 25) घडली आहे. या हल्ल्यात तीन मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी दासगाव येथे एका भटक्या कुत्र्याने काही जणांवर हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच विन्हेरेत सोमवारी सकाळी घरासमोर खेळणार्या लहान बालकांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात अवघ्या दीड वर्षाच्या श्रीअंश गणेश बांगर याच्या चेहर्याचे कुत्र्याने लचके तोडले; तर विवील सचिन विसापूरकर (8), श्रावणी संदीप आंजर्लेकर (9) यांच्या हात व पायावर कुत्र्याने चावा घेतला. याचबरोबर रामचंद्र विठोबा कदम (60, रा. फौजी अंबावडे) व सनिली शिवानंद कटीमली (34) या दोघांनाही या कुत्र्याने जखमी केले आहे. या सर्वांवर महाडच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.