कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील भुवनेश्वर हद्दीतून जाणार्या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतीतून सांडपाणी सोडतात. या सांडपाण्याला दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठी लोकवस्ती असलेले भुवनेश्वर हे गाव वसले आहे. पूर्वी भुवनेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेतीसह अन्य लागवड केली जात असे. या परिसरात उन्हाळी भातशेतीच्या सिंचनासाठी कालव्याची निर्मिती केली गेली. या कालव्यातून येत असलेल्या पाण्यावर भातशेतीसह अन्य शेती केली जायची. आज भुवनेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली, इमारती उभ्या राहिल्या आहेत. अशातच या परिसरात कालवा बंद आहे, मात्र नागरी वस्तीतील सांडपाणी या कालव्यात सोडले जात आहे. या सांडपाण्याचा ठिकठिकाणी निचरा होत नसल्याने कालव्यात पाणी साचले जातेे. थोड्या प्रमाणात निचरा होत असला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात कालव्यात सांडपाणी साचले जात आहे. या पाण्याची दुर्गंधी येत आहेच, शिवाय डासांची पैदास होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे इमारतींमधील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरीच्या काळात या सांडपाण्याविरोधात काही नागरिकांनी आवाज उठोवला होता. तहसीलदारांनीही आरोग्य विभागाला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते, पण पुढे त्याचे काय झाले हे अद्यापही नागरिकांसमोर
आले नाही. भुवनेश्वर येथील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून वरसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या समस्येचे निवारण करण्याची आवश्यकता आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …