सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सिडकोला निर्देश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पावसाळा तोंडावर असताना मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघरमधील भाजपच्या नगरसेवकांसमवेत खारघर येथील सिडको कार्यालयात अधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 25) झाली. या वेळी परेश ठाकूर यांनी ही कामे लवकरात लवकर मार्गी लावा, असे निर्देश सिडको अधिकार्यांना दिले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर या सिडको नोडमधील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती अध्यक्ष अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, नरेश ठाकूर, नेत्रा पाटील, आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, किर्ती नवघरे, किरण पाटील, दिलीप जाधव, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, सिडकोचे कार्यकारी अभियंता तात्यासाहेब आहिरे, कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक प्रभागातील म्हणजे प्रभाग 3, 4, 5 व 6मधील नियोजित व अवार्ड केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रभागावार आढाव्यात प्रत्येक सेक्टरमधील नाले व गटारे सफाईबाबत चर्चा झाली. नगरसेवक व पदाधिकार्यांनी आपापल्या प्रभागातील कामांबाबत सिडको अधिकार्यांना सूचना केल्या. या वेळी मोठ नाले तसेच गटारांची सफाई योग्य प्रकारे करून घेण्यात येईल तसेच ज्या ठेकेदारांना कामे दिली आहेत त्यांना तशा सूचना देऊ, असे सिडको अधिकार्यांनी सांगितले. या कामात नगरसेवक व पदाधिकार्यांनीही देखरेख करावी व काही अयोग्य काम होत असेल तर निदर्शनास आणून देऊन सिडकोला सहकार्य करावे, अशी विनंती दोन्ही अभियंत्यांनी केली. काही भागांत पावसाचे पाणी साचते व नागरिकांना त्रास होतो, त्या ठिकाणी ते पंप लावून काढण्यासाठी चार पंपांची व्यवस्था केली असून नेहमी पाणी साचते अशा दोन ठिकाणी कायमस्वरूपी पंप व दोन फिरते पंप ठेवू, असे सिडको अधिकार्यांनी सांगितले, तसेच मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या निविदा काढून ती कामेही करण्यात येतील, असे नमूद केले. ही बैठक प्रामुख्याने मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी असल्याने इतर कामांबाबत जास्त चर्चा झाली नाही, परंतु प्रमुख रस्त्यांवरील खड्डे, चर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या.