
नवी मुंबई : बातमीदार
संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने संकटात सापडलेल्या अवघ्या विश्वाला ’प्लाझा थेरपीने’ आशेचा किरण निर्माण केला आहे. अशातच आता नवी मुंबईत देखील प्लाझ्मा डोनेशनला सुरुवात झाली असून त्यानुसार या आगरी कोळ्यांच्या शहरात प्लाझ्मा डोनेट करणारे पाहिले भूमिपुत्र म्हणून नेरुळ गावातील देवनाथ म्हात्रे व प्रेमनाथ म्हात्रे या दोन भावंडांना मिळाला आहे.
त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण आगरी कोळी समाजतून स्वागत होत असून अनेक भूमिपुत्र प्लाझ्मासाठी पुढे येऊ लागले आहेत. येत्या काळात नवी मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासठी याचा फायदा होणार आहे. देवनाथ म्हात्रे व त्यांचे बंधू प्रेमनाथ म्हात्रे यांना कोरोनाची बाधा होऊन नुकतेच ते बरे झाले आहेत. नेरुळ येथील एन. आर भगत शाळेत प्लाझ्मा तपासणीचे शिबिर पालिकेच्या सहकार्याने राबविण्यात आले होते. अशातच रक्तात समाजसेवा असलेल्या म्हात्रे बंधूंनी या शिबिरात सहभाग घेतला.
यामागचा हेतू हाच की नवी मुंबईतील गंभीरावस्थेत असलेल्या कोरोना बाधितांना प्लाझ्मा थेरपीने जीवनदान मिळावे. या शिबिरात अनेक कोरोनाबधितांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी पालिकेकडून देखील आवाहन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांशी संपर्क साधला जात होता. त्यानुसार या शिबिरात इतर बरे झालेल्या व्यक्तींसह संपूर्ण नवी मुंबईत म्हात्रे बंधू हे पहिले भूमिपुत्र ठरले.