अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढल्यानंतर वरुणराजाने शुक्रवारी (दि. 7) पावसाने विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने सकाळी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी रायगडकरांना दिलासादेखील मिळाला आहे. जुलैपर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 50 टक्के पाऊस पडला होता. आता ही सरासरी 65 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सरासरी 2103 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नव्हता. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाचे प्रमाण मंदावले होते. जून महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरी 655 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र 523 मिमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात जिल्ह्यात साधारणपणे 1206 मिमी पाऊस पडतो. यंदा 1008 मिमी पाऊस झाला. म्हणजेच सलग दोन महिने सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान 874 मिमी आहे. यंदा सात दिवसांत 569 मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.
जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. या तुलनेत 7 ऑगस्टला सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात दोन हजार 103 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत 65 टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी पावसाची आतापर्यंतची वाटचाल समाधानकारक आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली 18 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर उर्वरित धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …