
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील एका शेतकर्याच्या गुरांच्या गोठ्यास शुक्रवारी सकाळी आग लागली. अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात असलेल्या गाय आणि वासरू यांना कोणतीही दुखापत न होता वाचविण्यात यश आले. शेतकरी तेथे दूध काढण्यासाठी गेल्याने धावपळ करून जनावरांना बाहेर काढल्याने कोणालाही इजा झाली नाही.
नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावातील शेतकरी मदन पाटील यांच्याकडे गाय आणि वासरू तसेच अन्य जनावरे आहेत. पहाटे त्यांच्या घरामागे असलेल्या गुरांच्या गोठ्यात गाय आणि वासरू होते. मदन पाटील गायीचे दूध काढताना अचानक आग लागली. पाटील यांनी तत्काळ गाय व वासराला गोठ्याबाहेर काढून कुटुंबीयांच्या मदतीने आग विझविली. गोठ्यातील सुक्या गवताच्या चार्याने पेट घेतल्याने आग भडकली, मात्र ग्रामस्थांना आग विझविण्यात यश आले. गोठ्यातील विजेच्या बॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजते.