नागोठणे ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतरा हजारांवर गेली आहे. कोठेही धोका निर्माण न करता या पार्श्वभूमीवर सर्वांना या वर्षी गणेशोत्सव साजरा करावयाचा असून महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले आहे. शनिवारी (दि. 8) सकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची सभा येथील पोलीस ठाण्यात पार पडली. या वेळी मार्गदर्शनपर भाषणात घुटुकडे बोलत होते. या वेळी सहा. पो. नि. विजयकुमार देशमुख, विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांसह शहर तसेच विभागातील 13 सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकार्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या वेळी पो. नि. घुटुकडे यांनी सर्वांनी आपली व समाजाची काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नागोठणे पोलीस तसेच तहसीलदारांची परवानगी बंधनकारक राहील. दर्शनाला येणार्यांची लेखी नोंद करून येथे सॅनिटायझर ठेवावे. आगमन तसेच विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. या वर्षी उत्सवात कमीत कमी खर्च करावा. मंडळांकडून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात यावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या.