खारघर : प्रतिनिधी
देशात जिमला परवानगी देण्यात आली असून राज्यात मात्र जिम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. यामुळे जिममालक आणि ट्रेनर पुरते वैतागले आहेत. लाखो रुपये भांडवल आणि लाखोंचे भाडे भरून जिममालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने आमचाही विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून अटी-शर्ती पाळून जिम सुरू करण्याची मागणी या संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
देशात अनलॉकला सुरुवात झाली आहे. केंद्रानेदेखील जिम सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने महाराष्ट्रात मात्र जिम सुरू करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला गेला नाही. यामुळे महाराष्ट्रातील जिम ओनर्स व ट्रेनर्स हवालदिल झाले आहेत. मागील चार महिन्यांहून जास्त काळापासून जिम बंद असल्याने ट्रेनर्सचे पगार तसेच जिमच्या भाड्याने जिममालक हवालदिल झाले आहेत. अनेकांनी कोट्यवधींचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्यावर कोरोनाच्या काळात कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केली आहे. याकरिता सर्व जिममालक तसेच या व्यवसायाशी जोडलेला प्रत्येक घटक रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या संघटनेशी जोडलेले दोन लाखांपेक्षा अधिक जिममालक आज कर्जबाजारी झाले आहेत. या व्यवसायाशी निगडित 10 लाख लोक आज बेरोजगार आहेत. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्य ओळखून जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी. आम्ही नक्कीच सर्व नियमांच्या अधीन राहून जिम सुरू करू, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर असोसिएशनदेखील या निर्णयाविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मॉल, सलून, बाजारपेठा, दुकाने सुरू होत असतील, तर जिमबाबत शासनाचे हे आडमुठे धोरण का, असा प्रश्न जिममालक व ट्रेनर्सच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.