
उरण : उरण शहरात गणपती चौकाजवळ असलेल्या 125 वर्षांपासूनच्या जुन्या श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मदत म्हणून प. पू. स्वामी श्री. इंद्रदेवश्वरनंद सरस्वतीजी महाराज यांचे राधे राधे परिवार उरण समिती यांच्याकडून शनिवारी (दि. 8) एक लाख 51 हजार रुपये चेकच्या स्वरूपात समितीचे सभासद गणेश गायकवाड, पत्रकार अतुल पाटील, राजेंद्र माळी, सतीश गुप्ता, नारायण तांडेल, सुभाष पाटील, पंढरी घरत, राजेश शहा यांच्या उपस्थितीत मंदिराचे ट्रस्टी चंद्रकांत ठक्कर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
चोरी झालेले पाकीट 14 वर्षांनी सापडले
पनवेल : पनवेल ते सीएसटी दरम्यान प्रवास करताना 2006 मध्ये चोरी गेलेला पैशाचा पाकीट फिर्यादी हेमंत पडाळकर यांना मिळाला. एप्रिल महिन्यात पडाळकर यांना अचानक रेल्वे पोलिसांकडून यासंदर्भात फोन आल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्याने त्यांनी हे पाकीट जुलै महिन्यात स्वीकारले. 14 वर्षांपूर्वी चोरी झालेल्या या पाकिटमध्ये 900 रुपये चोरी झाल्याची तक्रार पडाळकर यांनी रेल्वे पोलिसात नोंदवली होती. या नंतर तब्बल 14 वर्षांनंतर अचानक रेल्वे पोलिसांचा पाकीट सापडल्याबद्दल फोन आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर पडाळकर यांना या पॉकेटसह 300 रुपये मिळाल्याचे हेमंत पडाळकर यांनी सांगितले. हेमंत पडाळकर हे पनवेलमध्ये वास्तव्यास आहेत.
जखमी माकडाला जीवदान

उरण ः उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील एनडीआर कंटेनर गोदामात असणार्या ट्रान्सफार्मरचा विजेचा झटका लागून जखमी झालेल्या दुर्मीळ प्रजातीतील वेरवेट मंकी या मादी माकडाला वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी जीवदान देऊन जंगलात सोडले. माकडाला विजेचा झटका बसल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ प्राणिमित्रांना याची खबर दिली असता प्राणिमित्र महेश भोईर, विवेक केणी, बंटी शेळके, विनीत मढवी घटनास्थळी पोहचले. जखमी माकडाला पकडून त्याच्यावर उरण पशुवैद्यकीयमधील परिचारक प्रमोद मोकळ यांनी प्रथमोपचार करून उरण वनक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांना या घटनेची माहिती देऊन इंद्रायणी डोंगराच्या कुशीत सोडण्यात आले.
‘अंनिस’तर्फे ऑनलाइन ई-नाट्य सादरीकरण स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल येत्या 18 ऑगस्टला महाविद्यालयीन तरुणांसाठी याही वर्षी ‘विवेक जागर करंडक’ ही ऑनलाइन इ-नाट्य सादरीकरण स्पर्धा घेऊन येत आहे. महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा यावर्षी कोरोना आणि सद्यपरिस्थिती लक्षात घेता सहभागींसाठी झूम अॅपवर लाइव्ह पार पडणार आहे. प्रमुख म्हणजे अश्या पद्धतीच्या ऑनलाइन सांघिक नाट्य स्पर्धेचे आयोजन राज्यात पहिल्यांदाच करण्यात येत आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या भागातून महाविद्यालयांचा स्पर्धेत सहभाग असणार आहे. ’हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या अभियाना-अंतर्गत स्पर्धेसाठी विषय ‘भय इथले संपत नाही’ असा देण्यास आला आहे. महाविद्यालयीन तरुणांसाठी आपले म्हणणे सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची ही उत्तम संधी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला सात वर्ष पूर्ण होत आहेत, मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या खूनाचा निषेध करतानाच कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवतेला घातकच आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात, हा विचार समिती रुजवू पाहतेय. म्हणूनच ’हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे अभियान राबवले जाते. तरुणांनी वेगवेगळ्या भीतींचे सावट उराशी बाळगलेल्या जनमानसात भयमुक्ततेचा मार्ग शोधण्याची आणि व्यक्त होत जगण्याची उमेद जागृत करण्याचा प्रयत्न करावा यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. तसेच ही स्पर्धा फेसबुक लाईव्ह केली जाणार आहे. त्यामुळे तरुणाईला भरभरून प्रतिसाद देणारे प्रेक्षकांसाठीही ही वैचारिक मनोरंजनाची संधी असणार आहे. प्रेक्षकांनी घरबसल्या नि:शुल्क स्पर्धेचा आनंद फेसबुक वर घ्यावा, असे आवाहन केले आहे. संपर्कासाठी: 8652617382, 8082693903