Breaking News

‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन; लॉकडाऊन उठवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन उठविण्यात यावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन केले जात आहे. कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतेच एसटी आगारात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुक्यांत अशा प्रकारची आंदोलने केली

जात आहेत.

25 मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात येत होत्या. त्यात संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. खासगी व्यवस्थापनांची कार्यालये आणि बाजारपेठा बंद करण्यात आल्या. दुकाने, हॉटेल्स, मार्केट बंद करून लोकांचा आपापसांतील संपर्क होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. मागील चार महिन्यांतील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन अनेक निर्बंध उठविले गेले, मात्र सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब आणि हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार बुडत आहे.त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसाय सुरू करून अर्थचक्र वेगाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखविली आहे. 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. 100 टक्के लोकसंख्येवर निर्बंध घातल्याने आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. परिणामी बेरोजगारी आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.त्याच माध्यमातून राज्यभर वंचित बहुजन आघाडीने डफली बजाव आंदोलन सुरू केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जे आरोग्यविषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करीत सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे. एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे. गणेशोत्सवासाठी खासगी बस वाहतुकीचे बुकिंग सुरू झाले आहे. खासगी सेवा सुरू होत असतील तर सरकारी वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत, परंतु त्या फारच अपुर्‍या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करून गोरगरिबांना मदत व्हावी आणि अर्थचक्र सुरू राहावे यासाठी लॉकडाऊन आणि घातलेली जिल्हाबंदीही ताबडतोब उठवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. कर्जत एसटी आगारात करण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनील गायकवाड, अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, सरचिटणीस राहुल गायकवाड, ललित हिरे, शहर पदाधिकारी लोकेश यादव, भारतीय बौद्ध महासभेचे कमलाकर जाधव, अशोक कदम, अनिकेत गायकवाड, सुनील वाघमारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply