आगरदांडा बंदरात 200 बोटी स्थिरावल्या
मुरूड : प्रतिनिधी
मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्यामुळे सुमारे दोनशे बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. बुधवारीसुद्धा पावसाचे वातावरण होते. या वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, कर्नाटक आदी भागातील सुमारे दोनशे बोटी सध्या विसावल्या आहेत. त्यामुळे येथे सर्वत्र बोटीच बोटी दिसून येत आहेत.
किनारी थांबलेल्या बोटींची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरवण्याबाबत लक्ष दिले जात आहे.
याबाबत बोलताना रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल होऊन खोल समुद्रात जोरदार पाऊस, उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. धोका वाटत असल्याने अनेक बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने या ठिकाणी थांबल्या आहेत.