कर्जत : बातमीदार
रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पापोटी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांना त्यांनी दिलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी रिलायन्स कंपनी आणि प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने या प्रकल्पग्रस्तांनी येत्या बुधवारी (दि. 19) कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणेदरम्यानच्या इथेन गॅस वाहून नेणार्या पाइपलाइन प्रकल्पात कर्जत तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत. दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत, मात्र जी रक्कम शेतकर्यांना सांगण्यात आली त्यानुसार ती दिली गेलेली नाही. काही शेतकर्यांना तर जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आला नाही. प्रकल्पात गेलेल्या जमिनीची नासधूस होत असून, कोणतेही उत्पन्नदेखील घेता येत नाही. यासंदर्भात अनेकदा मागणी, पत्रव्यवहार करूनही मोबदला मिळाला नाही की निर्णय झाला नाही. अखेर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी सर्व शेतकरी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. न्याय्य हक्कासाठी गुन्हे अंगावर घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण आता मागे हटायचे नाही, असा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी केला आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला असून, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण होणार आहे, अशी माहिती कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी दिली. या उपोषणाचे नेतृत्व भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत करणार असून, प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, जनार्दन तरे, प्रल्हाद राणे, सुरेश खाडे, रमेश कालेकर, रोहित राणे, नरेश कालेकर, उमेश राणे, मंगेश तरे, बाळा शेकटे, अमर मोगरे, तुकाराम तरे, दिनकर सोनावळे, सुनील शेकटे, वंदना शेकटे, गणपत बाबरे, तुकाराम काळण, वालकू सोनावळे, पंढरीनाथ सोनावळे, वसंत शेळके, तानाजी हजारे, मुक्ताबाई माळी, शांताराम हडप आदी उपोषणाला बसणार आहेत.