Breaking News

लसीकरणाची वर्षपूर्ती : आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रोजगार, शिक्षण, आणि उपजीविकेची सर्व साधने अबाधित रहावीत या उद्देशाने गेल्या वर्षभरात तंत्रज्ञानावर भर देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वांत मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस नुकतेच (दि. 16) एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ मिळाले असून देशाचे जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत असल्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले.
एका बाजूला सर्वाधिक सुरक्षा उपायाचा अवलंब करतानाही जनजीवर पूर्वपदावर येण्याकरिता केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र मात्र पुन्हा सर्व व्यवहार बंद करून राज्याला अस्थिरतेकडे नेत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी 16 जानेवारी 2021 रोजी मनीष कुमार नावाच्या 34 वर्षांच्या सफाई कर्मचार्‍यास कोविडविरोधी लसीची पहिली मात्रा देऊन या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. 14 जानेवारी 2022 रोजी या मोहिमेंतर्गत लसीकरणाच्या 156 कोटी मात्रा पूर्ण झाल्या असून 93 टक्के जनतेचे पहिल्या मात्रेचे, तर 70 टक्के जनतेचे दोनही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दररोज सरासरी 43 लाख लोकांचे लसीकरण करणारी जगातील ही सर्वाधिक वेगवान मोहीम मोदी सरकारमुळेच देशात राबविली गेल्याने देशाला कोविडविरोधी सुरक्षेचे मोठे कवच प्राप्त झाले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. कालपर्यंत देशातील 15 ते 18 वयोगटातील 43 टक्के
युवकांना पहिली मात्रा पूर्ण झाली आहे, अशी माहितीही यांनी दिली.
तेलंगणा, गोवा, सिक्कीम, दादरा-नगरहवेली, दीव-दमण, लडाख, लक्षद्वीप येथे पहिल्या मात्रेचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून  मोहिमेच्या पहिल्या 78 दिवसांतच भारताने 100 कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करून जागतिक स्तराव मोठी आघाडी नोंदविली आहे. 17 सप्टेंबर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, एकाच दिवशी अडीच कोटी लसीकरण करून जगभरातील लसीकरणाच्या मोहिमांतील विक्रमही भारतानेच प्रस्थापित केला ही अभिमानास्पद बाब आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
केवळ देशांतर्गत लसीकरणच नव्हे, तर वसुधैव कुटुम्बकम या वैश्विक भावनेने व सर्वे भवन्तु सुखिनः या सांस्कृतिक परंपरेनुसार जगातील 94हून अधिक देशांना सव्वासात कोटी लसमात्रांचा पुरवठा करून मोदी सरकारने विश्वकल्याणाच्या संस्काराचे दर्शन घडविले आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. संख्येच्या हिशेबात पाहता भारताने इंग्लंडच्या लसीकरणाच्या 23 पट, जर्मनीच्या 19 पट, फ्रान्सच्या 23 पट, ब्राझीलच्या आठ पट, जपानच्या 12 पट, इटलीच्या 26 पट, स्पेनच्या 33 पट, तर कोरियाच्या 30 पटीने अधिक लसीकरण विक्रमी वेळात पूर्ण केले, अशीही माहिती त्यांनी दिली.
संपूर्ण जग कोविड महामारीमुळे आर्थिक संकटाशी सामना करीत असताना भारताचा विकास दर मात्र उंचावत असून मोदी सरकारच्या आर्थिक नीतीमुळे विकासदराचा आलेख उंचावताना दिसत आहे. कोविडकाळातदेखील भारताचा महागाई निर्देशांक सहा टक्क्यांहून सातत्याने कमी राहिला असून अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येण्याचा वेग 97.6 टक्के म्हणजे जगाच्या तुलनेत सर्वाधिक राहिला. जगभरातील अनेक वित्तसंस्था व अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी याबद्दल मोदी सरकारची प्रशंसा केली असून भारताची प्रतिष्ठा उंचावल्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे, अशी भावनाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
याच काळात भारतातील राजकीय नेते मात्र अपयशाचे खापर मोदी सरकारवर फोडण्याचा अपयशी प्रयत्न करीत होते व अपप्रचारात मग्न होते, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणाचेही नाव न घेता केली. लसीकरणाबाबत जनतेत संभ्रम माजविण्याचे प्रयत्नही काही नेत्यांनी केले, पण भारतीय जनतेने मोदी सरकारवर दाखविलेल्या विश्वासामुळे असे नेते तोंडघशी पडले, असा टोलाही त्यांनी हाणला. कोविडशी झुंजत देश झपाट्याने पुढे जात असताना महाराष्ट्र सरकार मात्र शिक्षणव्यवस्थेस टाळे लावून अनेक नवे निर्बंध लादत राज्याला मागे नेत आहे, अशी खंतही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply