Breaking News

मासेमारी नौका अद्यापही बंदरातच; मच्छीमारांचा नव्या हंगामाचा मुहूर्त लांबला

अलिबाग : प्रतिनिधी

मच्छीमारांसमोरील विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत. नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सरसावलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना वादळी हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे. यामुळे मासेमारीवरील दोन महिन्यांचा शासकीय बंदी कालावधी संपून अर्धा महिना उलटला तरी मासेमारी नौका अद्यापही बंदरातच नांगरलेल्या असल्याने येथील मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.

लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यात गेलेले कामगार आणि तीन वेळा आलेल्या वादळामुळे मागील मासेमारी हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. नव्या हंगामाची सुरुवात चांगली होईल, अशी अपेक्षा रायगडमधील मच्छीमारांना होती, परंतु ही अपेक्षा धुळीला मिळाली आहे. लॉकडाऊननंतर परतलेल्या कामगारांचे पगार, नौकांची डागडुजी, जाळ्यांची खरेदी, कर्जाचे हप्ते भरून संसार कसा चालवायचा, असा प्रश्न येथील मच्छीमारांना सतावू लागला आहे. शासकीय बंदी 1 ऑगस्ट रोजी संपण्यापूर्वी नव्या हंगामासाठी निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा पुसत मच्छीमारांनी जय्यत तयारी केली होती, पण 4 ऑगस्टपासून सुरू झालेले वादळ अद्याप शांत झालेले नाही. त्यामुळे मोरा, मांडवा, वरसोली, साखर-आक्षी, नागाव, राजपुरी, एकदरा, मुरूड, जीवना, दिवेआगर, शेखाडी येथील शेकडो नौका अद्यापही बंदरातच आहेत. मच्छीमार वादळ शांत होण्याची वाट पाहत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply