अहमदनगर : प्रतिनिधी
काँग्रेसने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही, मात्र शरदरावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. अहमदनगर येथील भाजपचे लोकसभा उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 12) पंतप्रधान मोदी नगरमध्ये आले होते. या वेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पवारांवर निशाणा साधला. काँग्रेस फुटीरतावाद्यांसोबत आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही, मात्र पवारांना काय झालंय तेच कळत नाही. तुम्ही देशाच्या नावाने काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना तुम्ही कधीपर्यंत गप्प राहणार? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देशाला आता विदेशी चष्म्यातून पाहत आहात का? तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी हे नाव केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच ठेवलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले असतानाही तुम्हाला झोप कशी येते? असे सवाल मोदींनी केले.
राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तुम्हाला मंजूर आहे का? असा सवाल करताना जवानांच्या शौर्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन मोदींनी केले.
शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाण्याच्या नियोजनासाठी आम्ही वेगळे मंत्रालय तयार करणार आहोत. शेतकरी कृषी योजनेत बदल केला जाईल. 60 वर्षांवरील शेतकर्यांना पेन्शन देण्यात येणार आहे, तसेच उसापासून इथेनॉल निर्मितीला बळ देणार आहोत.
या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते.