Breaking News

संभाव्य तिसर्या लाटेची खबरदारी

नवी मुंबईत कोरोना चाचण्यांत वाढ; खाटांचे नियोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र वाटत असतानाच गुरुवारी राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही येत्या सणासुदीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचा विसर पडू न देण्याचे आवाहन केले आहे. इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता साधारणत: सप्टेंबर महिन्यात तिसर्‍या लाटेचा धोका जाणवणार असल्याची शक्यता केंद्रीय निती आयोगाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीच्या कामांना गती दिली आहे.

सध्या निर्बंध हटविण्यात आल्याने रुग्णवाढीची भीती लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी सतर्कतेने पावले उचलली जात आहेत. याकरिता मास्क, सुरक्षित अंतर या कोरोनासुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी लक्ष्याधारित चाचण्यांवर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

या अनुषंगाने ऐरोली व नेरूळ ही दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 200 खाटांपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. तिसर्‍या लाटेमध्ये मुले बाधीत होण्याचे प्रमाण अधिक असेल, या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नेरूळ व ऐरोली या दोन्ही रुग्णालयांत प्रत्येकी 80 खाटांच्या लहान मुलांच्या स्वतंत्र कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येक 50 खाटांचे प्रसूतीपूर्व व प्रसूतिपश्चात कोरोना उपचार कक्षाचे नियोजन केले जात आहे. या दोन्ही रुग्णालयांतील खाटा, ऑक्सिजन पाइपलाइन, इलेक्ट्रिकल काम पूर्ण करून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत वापरात यावेत, यासाठी दिवसरात्र काम करावे, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासोबतच मयुरेश चेंबर्स येथील 485 ऑक्सिजनखाटा व पोळ फाऊंडेशन येथील 550 ऑक्सिजनखाटांचे कामही वेगाने सुरू आहे.

सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 20 टन क्षमतेची ऑक्सिजनटाकी आली असून आणखी दोन टाक्या 30 ऑगस्टपर्यंत येतील. याशिवाय, 10 सप्टेंबरपर्यंत आणखी एक 20 टन क्षमतेची टाकी उपलब्ध करून घेऊन एकूण 80 टन ऑक्सिजनटाकीची क्षमता पूर्ण करून घेण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. महानगरपालिकेच्या एकूण 93 टन क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्यांचे नियोजन असून त्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply