तहसील कार्यालयात पालकांची गर्दी
कर्जत ः बातमीदार
कोरोनामुळे शासकीय दाखले देणारे कर्जत तहसील कार्यालयातील सेतू केंद्र तीन महिने बंद होते, मात्र आधी पालकांनी आपल्या पाल्याचे दिलेले नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला यांची पूर्तताही झालेली नाही. दरम्यान, तहसील कार्यालयातून दाखले प्रांताधिकारी कार्यालयात गेले असल्याचे तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगत आहेत.
लॉकडाऊन असल्याने कर्जत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची दाखले घ्यायला गर्दी झाली नाही, मात्र कर्जत तहसील कार्यालयात त्याआधी सादर केलेले शासकीय दाखलेही विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. त्यात प्रामुख्याने शाळा-कॉलेजमध्ये महत्त्वाचे असलेले नॉन क्रिमिलेअर आणि जातीचे दाखले हे विद्यार्थ्यांना मिळू शकले नव्हते. त्यात जून महिन्यापासून लवकरच शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल दाखले याचबरोबर नॉन क्रिमिलेअर दाखले आणि जातीचे दाखले काढण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती, परंतु त्यातील उत्पन्न आणि अधिवास दाखले विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, परंतु प्रामुख्याने नॉन क्रिमिलेअर आणि जातीचे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. त्यात हे सर्व दाखले मिळविण्यासाठी शासनाच्या सेवा केंद्रामधून ऑनलाइन पध्दतीनेदेखील अर्ज करता येतो. निर्धारित मुदतीत त्या ठिकाणी ऑनलाइन दाखले मिळविता येतात, मात्र लॉकडाऊनपासून शालेय कामासाठी आवश्यक असलेले दाखले विद्यार्थ्यांना अद्याप मिळाले नाहीत. याबाबत चौकशी करण्याची व्यवस्था असलेल्या कर्जत तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात पालक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसतानाही फेर्या मारत आहेत.
तालुक्याच्या सर्व भागातून विद्यार्थी दाखले मिळविण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात पोहचत असून सर्व दाखले सेतू कार्यालयातून मिळत असल्याने तेथे दाखले मिळविण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु सेतू कार्यालयातून दाखले बनवून तहसील कार्यालयात पाठवले जातात. तेथे नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सही करून पुढे कार्यवाहीसाठी पाठवितात. अशी कार्यपद्धती असून त्यातील नॉन क्रिमिलेअर आणि जातीचे दाखले हे पुढे अंतिम सहीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात पाठविले जातात, परंतु प्रांताधिकारी कार्यालयातून दाखले सही होऊन आमच्याकडे आले नाहीत, अशी माहिती सेतू कार्यालयातील कर्मचारी अर्जदार पालक आणि विद्यार्थ्यांना देत आहेत.
याबाबत कर्जत तहसील कार्यालयात चौकशी केली असता नायब तहसीलदारांनी आमच्याकडे जेमतेम आठ दिवसांचे दाखले पुढे पाठवायचे शिल्लक असतील. त्याचवेळी ते दाखले संबंधित विभागाचा क्लार्क हा आठवड्यापासून दुसरे काम करीत असल्याने पेंडिंग असतील, असे समजले, परंतु कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात हे सर्व दाखले साठून राहिले असण्याची शक्यता पालकांना आहे. त्याबाबत कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांची काही पालकांनी भेट घेतली असता त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारांना फोन करून शालेय विद्यार्थ्यांचे दाखले शिल्लक असल्यास ते प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना केली आहे, मात्र सर्व दाखले हे प्रांताधिकारी कार्यालयातून सही होऊन सेतूमध्ये किंवा ऑनलाइन प्राप्त होत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. चार महिने दाखले मिळत नसल्याने आपले अर्ज गहाळ तर झाले नाहीत ना या भीतीने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे आता नॉन क्रिमिलेअर व जातीचे दाखले कधी मिळणार याची माहिती जाहीरपणे द्यावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
आमचे कार्यालय कोरोनावर काम करीत असल्याने दाखले आमच्या कार्यालयात येऊन राहिले असतील, मात्र आज कार्यालयात नसल्याने उद्या (20 ऑगस्ट) कार्यालयात पोहचल्यावर त्यावेळी सर्व दाखल्यांवरील कार्यवाही पूर्ण केली जाईल.
-वैशाली परदेशी, प्रांताधिकारी, कर्जत