आमदार विनायक मेटे यांची मागणी
रोहे : प्रतिनिधी
तांबडी बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा कशी मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याकरिता सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. मी यासंबंधी निकम यांच्याशीही चर्चा केली असून, त्यांनीही हा खटला लढवण्याचे मान्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य तपास करून आरोपींविरोधात आठ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
आमदार मेटे यांनी बुधवारी (दि. 19) अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर रोह्यातील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश सावंत, सकल मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख, पांडुरंग मालुसरे, ऐश्वर्या राणे, मळगावकर, सुहास येरुणकर, सूर्यकांत मोरे, नीलेश शिर्के आदी सोबत होते.
आमदार मेटे म्हणाले की, पोलिसांनी सर्वांगाने तपास करावा. पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी समाजबांधवांच्या माध्यमातून आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करू.