धाटावमधील एलपी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन
रोहे : प्रतिनिधी
आमची भूमिका कारखाने बंद पाडण्याची नाही, परंतु कारखानदाराकडून स्थानिकांना न्याय मिळत नसेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर कारखानदारांना सांगावे लागेल की, हा कारखाना इथल्या लोकांसाठी आहे. ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होत असेल त्या औद्योगिक क्षेत्रात भाजप कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी (दि. 19) केले.
धाटाव औद्योगिक क्षेत्रात कारखानदार व व्यवस्थापन समितीकडून कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकणे, कोरोना काळात त्रास देणे यासह होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एलपी कंपनीच्या गेटसमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्या वेळी विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. आमचे आंदोलन कारखान्याच्या विरोधात नसून, कामगारांना न्याय मिळावा यासाठी आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
आमदार रविशेठ पाटील म्हणाले की, आम्ही औद्योगिक क्षेत्रात कामगारविरोधी घटना, विविध समस्या या सगळ्या गोष्टींचा शहानिशा करण्यासाठी आलो आहोत. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे.
या आंदोलनास भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, राजेश मापारा, शहराध्यक्ष वसंत शेलार, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, भारतीय मजदूर संघाचे संदीप मगर, अशोक निकम, कृष्णा बामणे, राजेश डाके, निमेश वाघमारे, कामगार नेते अभ्यंकर, सुधाकर शिलधनकर, कुणाल पटनाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कामगारांवर होणार्या अन्यायाचा निषेध केला. दरम्यान, या वेळी एलपी कंपनीसमोर भारतीय मजदूर संघाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.