पनवेल : वार्ताहर
खांदा वसाहतीत अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनत होते. त्याचबरोबर काही जागांवर पदपथ सुद्धा तुटलेल्या आहे. त्यापैकी काहींची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याचे काम सिडकोने बुधवारपासून हाती घेतले आहे. नगरसेविका सीता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वसाहतीतील रहिवाशांची काही प्रमाणात का होईना गैरसोय कमी होणार आहे.
खांदा वसाहतीतील अंतर्गत रस्ते खोदून त्याठिकाणी महानगर गॅस चे पाईप टाकण्यात आले आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित रित्या रस्ते बुजवण्यात न आल्याने अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे त्यामध्ये वाहने आढळतात परिणामी दुचाकी आणि चारचाकींचे नुकसान सुद्धा झालेले आहे. याशिवाय लहानशे अपघात येथे घडतात. दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचुन डबके तयार होतात. त्यातून डासांची उत्पत्ती होत असल्याने त्याचा रहिवाशांना त्रास होतो. पाणी साचल्याने आत मधील खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मुख्य रस्त्याबरोबरच सेक्टर 9 आणि सात येथेही हीच समस्या आहे. याकरिता सीता पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. लॉकडाऊनमुळे कामे रखडली होती. त्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही तांत्रिक अडचणी आल्या.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हे खड्डे बुजवून रहिवाशांना दिलासा द्या, अशी मागणी सीता पाटील यांनी सिडको अधिकार्यांकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सिडकोने खड्डे बुजवण्यात सुरुवात केली आहे. खड्ड्यांमध्ये ओळखली खडी टाकून ते बुजवण्यात येत आहेत. सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे, भालचंद्र टंकर यांच्यासह झेनीथ कंस्ट्रक्शन कंपनी प्रोजेक्ट मॅनेजर विकास शहा यांनी स्वतः उभे राहून हे काम हाती घेतले आहे. नगरसेविका पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी पदपथ तुटलेले आहेत त्यांची दुरुस्ती करून देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार हेही काम सिडकोने हाती घेतले आहे.