अलिबाग ः प्रतिनिधी
आपल्या लाडक्या बाप्पाची भक्तांनी मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्हाभरातील दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी (दि. 23) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाची शोडषोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती पार पडली. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे सर्वांनीच आपल्या लाडक्या गणरायाला घातले. दीड दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रविवारी संध्याकाळी लाडक्या गणपती बाप्पाचे ठिकठिकाणी विधिवत विसर्जन करण्यात आले.कोरोना मुळे शासनाने मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी कुठेही गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहायला मिळाल्या नाहीत. सर्वत्र शांततेत विसर्जन सुरू होते. ग्रामीण भागात तळी, नद्या, ओढे या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपालिकेने आपल्या बाप्पाचे विसर्जन आम्ही करू, असा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी समुद्रकिनारी मंडप उभारण्यात आला होता. तेथेच विसर्जनासाठी आलेल्या भक्तांकडून गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. नगरपालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक तसेच जीवरक्षकांच्या मदतीने समुद्रात या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून गणेशभक्तांना समुद्रकिनारी प्रवेश देण्यात आला नाही.