Breaking News

चेन्नईने रोखला विराटसेनेचा विजयरथ; वानखेडेवर जडेजाच्या फलंदाजीचे वादळ

मुंबई ः प्रतिनिधी

चेन्नईच्या धोनी ब्रिगेडने विराटसेनेचा विजयरथ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोखला. चेन्नईने 69 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासाह धोनी ब्रिगेड आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. या सामन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करीत मोठी धावसंख्या उभारली. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात त्याने 37 धावा ठोकल्या. यात 5 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. रवींद्र जडेजाने 28 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीमुळे चेन्नईने बंगळुरूसमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बंगळुरूची फलंदाजी अक्षरश: कोलमडून गेली. आघाडीचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. विराट, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स स्वस्तात बाद झाले. फलंदाजीसोबत रवींद्र जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकले. तसेच क्षेत्ररक्षणात आपली कसब दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 3, इम्रान ताहिरने 2, तर सॅम करन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक गडी बाद केला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरूची फलंदाजी ढासळली. कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर व मॅक्सवेल चांगली कामगिरी करू शकले नाहीत. विराट अवघ्या 8 धावा करून तंबूत परतला. सॅम करनच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. त्यानंतर पडिक्कलही मैदानावर तग धरू शकला नाही. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने त्याचा झेल घेतला. पडिक्कलने 15 चेंडूंत 34 धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करून तो बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल पकडला. त्यानंतर बंगळुरूच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही स्वस्तात बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. वानखेडेवर रवींद्र जडेजाच्या फलंदाजीचे वादळ पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात त्याने हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करीत 5 षटकार आणि एक चौकार ठोकत 37 धावा केल्या. फाफ आणि जडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईने 191 धावा केल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply