Breaking News

अंगणवाडीतील परसबाग फुलली; ऊसर्ली व घरकुल येथे खिचडीसाठी ताज्या भाज्यांचा वापर

पनवेल : बातमीदार

एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीत परसबाग फुलविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार काही अंगणवाड्यांना या बागा फुलविण्यात यश आले आहे. पनवेल तालुक्यात ऊसर्ली व घरकुल या अंगणवाडीतील परसबाग फुलली असून, त्यापासून मिळणार्‍या ताज्या भाज्यांचा वापर आता पोषण आहारात होत आहे. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीतील मुलांना पूरक आणि संतुलित आहार मिळावा म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. ऊसर्ली व घरकुल या अंगणवाडीत अंगणवाडीसेविका, लोकसहभाग व अंगणवाडीतील मुलांच्या सहभागाने परसबाग फुलली आहे. परसबागांमध्ये केळी, पपई या फळझाडांसह बीट रूट, पालक, चुका, शेवगा, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे. सध्या आहारात या परसबागेतून कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता याचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिक खतांवर येत आहेत. यापूर्वी पोषण आहारासाठी भाज्या विकतच्या घ्याव्या लागत असल्याने त्याचे प्रमाण कमी होते. ऊसर्ली अंगणवाडीत 45; तर घरकुल या अंगणवाडीत 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ताज्या भाज्यांमुळे पोषण आहारातील खिचडी व इतर पदार्थाची चव वाढली असून, विद्यार्थी आवडीने आहार घेत आहेत.

– परसबाग या उपक्रमात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्यात उत्साह वाढत आहे. पूर्वी पोषण आहाराच्या खिचडीत डाळ, तांदूळ यांचा समावेश केला जात होता. त्यात काही बाजारातील भाज्यांचा वापर केला जात असे. आता परसबागेतील ताज्या भाज्या वापरता येत आहेत. विद्यार्थीही आवडीने आहार घेत आहेत.

– वनिता वाघ, पर्यवेक्षिका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply