Breaking News

फळ मार्केटकडे नागरिकांची पाठ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद 140 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात प्रतिदिन जवळपास दीड ते दोन हजार टन फळांची आवक होत असते, परंतु या वर्षी जेमतेम एक हजार टन फळांचीच आवक होत आहे. गतवर्षी उत्सव काळात हिमाचल प्रदेश व काश्मीरमधून 50 ते 60 ट्रक सफरचंदाची आवक होत होती. या वर्षी फक्त 15 ते 20 ट्रक येत आहेत. सोमवारी 332 टन सफरचंदाची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये सफरचंद 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 140 ते 200 रुपयांवर गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सफरचंदाऐवजी इतर फळांना पसंती दिली आहे.

किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू 100 रुपये किलो, डाळिंब 80, पपई 40, पेरू 100, संत्री 200 व सीताफळ 80 रुपये किलो दराने विकले जात आहे. मोसंबी 120 रुपये डझन दराने विकली जात आहे. उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरात हे दर यापेक्षाही जास्त आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. दैनंदिन गरजा भागविणेही अवघड झाले आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. एपीएमसीमध्ये ही ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. या वर्षी सफरचंदाचे उत्पादनही कमी झाले असून, त्याचा दर्जाही हलका आहे, परंतु यानंतरही भाव वाढल्याने सामान्य नागरिक इतर फळांना पसंती देत असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपल्यानंतरच पूर्ववत खरेदी-विक्री होईल, असा अंदाज फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केला.

भाजीपाल्याच्या दरात वाढ

श्रावण महिन्यात आवक वाढत भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे सध्या एपीएमसीतील भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे.  त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी भाजी बाजारात 350 गाड्या आवक झाली असून त्यातून येणारा भाजीपाला हा कमी प्रमाणात असल्याचे भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. त्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाला दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. पंधरा ते वीस रुपयांवरून टोमॅटो 18 ते 22 रुपये प्रतिकिलो, फ्लॉवर 18 ते 20 रुपयांवरून 24 ते 30 रुपये, कोबी 16 रुपयांवरून 18 ते 20 रुपयांवर तर हिरवी मिरची 30 रुपयांवरून 36 रुपये इतका दर झाला आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply