पोलादपूर तालुक्यात देवदिवाळीनंतरच्या दुसर्या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून बैलदिवाळी साजरी करण्याची परंपरा असून ग्रामीण भागात या सणाला आता प्रतिष्ठा, मानमरातब आणि मर्दूमकीचा सण म्हणून ओळखले जात आहे. राजकीय प्रचाराला आणि व्यक्तिमत्त्वांना उजाळा देण्यासाठी बैलदिवाळी जशी उपयुक्त ठरत आहे, तशाच रेड्यांच्या झोंब्या गुपचूप होण्यासाठी हेच नेते सुव्यवस्था राखण्यास मदत करीत असल्याचा आव आणून लोकप्रियता वाढवित आहेत. या पाळीव प्राण्यांच्या खेळांच्या परंपरेसोबत पोलादपूर तालुक्याने बैलाचे उत्तरकार्य पाहिले आहे, तसेच रेड्यांची आत्महत्यादेखील पाहिली आहे.
दिवाळीनंतर देवदिवाळी झाली की, शेतकरी आणि त्याची सर्जा-राजाची बैलजोडी शेतीच्या कामातून मोकळी झालेली असते. देवदिवाळीनंतरच्या दुसर्या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून बैलदिवाळी साजरी करण्याची परंपरा असल्याने पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात या दिवशी बैलांना सजवून शेताच्या खाचरांत नाचविले जाते. बैलांच्या शिंगांना झुपकेदार रंगीबेरंगी तुरे लावून त्याची वेसण मालकांच्या हाती दिली जाते. अनेकदा शेतकरी असूनही शेतीकामापासून दूर झालेल्या चाकरमान्यांनाही या बैलदिवाळीचे आकर्षण असल्याने अन्य गावांतून ट्रक, टेम्पो, तसेच अन्य वाहनांमधून बैल आणले जातात. इतर गावांतील शेतकरी यासाठी बैलाचे भाडे घेत नसले, तरी चाकरमानी हौसेने काही रक्कम त्यांच्या खिशात कोंबतात. बैलांना नाचवायचे म्हणजे जिगर पाहिजे, अशी भावना असल्याने ही जिगर निर्माण होण्यासाठी काहीसे मद्यपानही केले जाते. बैल नाचवायचा पहिला मान गावच्या फौजदाराचा असतो.
शेतकरी या दिवशी बैलाला स्वच्छ धुऊन त्याच्यावर गुलाल उधळून सजवितो. या वेळी कापणी-मळणी झालेल्या शेताच्या बांधावरून खाचरामध्ये बैल उतरविताना स्वतः शेतकरी असेल तर तो स्वतःकडे बैलाची वेसण धरतो आणि चाकरमानी असेल तर दोन वेसणी लावून एक चाकरमान्याच्या, तर दुसरी वेसण स्वतःकडे ठेवतो. बैलाची वेसण ओढली की तो पुढच्या पायावर झुकून उडी मारतो. असे अनेकदा केले की बैल नाचतोय असे वाटू लागते. या नाचणार्या बैलाचे उधळणे झाले की, ग्रामस्थ त्याच्याभोवती काठ्या घेऊन फिरतात. या उधळलेल्या बैलाच्या शिंगावरचे झुपकेदार तुरे जो कोणी तरुण काढतो; त्याच्या चेहर्यावरचा आनंद त्याच्या मर्दुमकीला साजेसाच असतो. असे बैल नाचविण्यासाठी अनेक जण गावाकडे आलेले असतात, तर काही गावातलेच असतात. दुपारचे टळटळीत उन्हं लागण्यापूर्वी हा सण जोर धरतो आणि त्यानंतर मांसाहारी लोक येथेच्छ मांसाहारासोबत मद्यपानही करतात. इतर शेतकरी गोडधोड करून सण साजरा करतात. बुधवारी तुर्भे भागात तर शुक्रवारी पोलादपूर तालुक्याच्या अन्य ग्रामीण भागात साजर्या झालेल्या या सणाची चर्चा गावोगांव ऐकण्यास मिळत होती. रविवारीदेखील हा बैलदिवाळीचा सण काही गावांत होणार असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहेत, मात्र नुकत्याच राज्यभर झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैलदिवाळीत ग्रामस्थ विशेषत: तरुण मराठा अशी अक्षरे लिहिलेले टीशर्टस् आणि जगदंब अक्षरे लिहिलेली स्वेटर्स परिधान करून बैल नाचविण्यासाठी शेत-खलाटीमध्ये दिसून आली. काही गावांत बैल नाचविण्याच्या या सणामध्ये पोलादपूर पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवारही आवर्जून उपस्थित राहू लागले आहेत. या सार्वजनिक सणात कोणीतरी नातेवाईक या इच्छुकाला सन्मानित करण्याचे सेटिंग लावत असल्याचीही चर्चावजा धुसफूस ऐकण्यास येत असते.
दिवसभर आणि रात्रीही कोणाचा बैल कसा नाचला अन् कोणी कसा तुरा खेचला… कोण पडलं आणि कोण तडफडलं… याच्या खुमासदार चर्चा सुरू होत्या. रविवारी बैल नाचविण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने आता हवशे, नवशे आणि गवशे आपला मोर्चा रविवारी पोलादपूरच्या खेडोपाडी वळवून आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत.
-शैलेश पालकर, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper