अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे सरकारकडून बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानंतर देशातील बहुतांश मंदिरे खुली करण्यात आली आहेत, मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ठाकरे सरकारने मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली करण्यास विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 29) सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नागोठणे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली महाराष्ट्रातील मंदिरे सरकारकडून खुली करण्यात यावीत यासाठी येथील ग्रामदेवता श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात नागोठणे विभागीय भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता आरती करून घंटानाद करण्यात आला.
या वेळी भाजपचे रोहे तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, महिला आघाडीच्या अध्यक्ष श्रेया कुंटे, ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. मनीषा कुंटे, तिरतराव पोलसानी, विठोबा माळी, सुरेश जैन, रऊफ कडवेकर, अंकुश सुटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मंदिर व परिसरात पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पेण ः प्रतिनिधी – देशातील अन्य राज्यांत मंदिरे खुली करण्यात आली असून महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद व दारूची दुकाने सुरू आहेत. राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरासह पेणमध्येही शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
पेणमध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोटेश्वर मंदिर येथे घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप दक्षिण उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, नगरसेवक प्रशांत ओक, माजी नगरसेवक सुधीर जोशी, अजय क्षीरसागर, नाना महाडिक आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी आघाडी सरकारचा निषेध करताना सांगितले की, झोपेचे सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी पेण तालुका भाजपकडून आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन करण्यात येत असून इतर राज्यांत मंदिर, मस्जिद, चर्च सर्व सुरू असताना फक्त महाराष्ट्रातच बंद का, असा सवाल या वेळी आघाडी सरकारला करण्यात आला.
राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम, अटी-शर्तींसह देवस्थाने व धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची मागणी भाविक भक्तांकडून राज्य सरकारकडे होत आहे, मात्र या मागणीकडे महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने भाजपच्या वतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी शांता भावे, शिवाजी पाटील, भास्कर पाटील, विशाल शिंदे, रवींद्र म्हात्रे, नरेश जैन, रूपेश वेदक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाड ः प्रतिनिधी – राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थानस्थळे पुन्हा खुली करावीत, या मागणीसाठी शनिवारी भाजपच्या वतीने महाडमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर देशातील बहुतांश मंदिरे खुली करण्यात आली आहेत, मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ठाकरे सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्यास विरोध दर्शविला आहे. याविरोधात सरकारचे डोळे उघडण्यासाठी महाड येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोहिनूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणेशासमोर घंटा वाजवून ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, युवा मंच अध्यक्ष अक्षय ताडफळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप ठोंबरे, जिल्हा चिटणीस मंजुशा कुद्रीमोती, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, गणेश शिर्के, सोशल मीडिया सेलच्या श्वेता ताडफळे, कोमल शेठ, शंकर महाडिक आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद बसलेली राज्यातील मंदिरे पुन्हा सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी अलिबागमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी मंदिरांबाहेर भाजपने घंटानाद आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध केला.
अलिबाग येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिराबाहेर भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष अनंत पाटील, पंचायत समिती सदस्य उदय काठे, अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, माणिक बळी, सतीश लेले, सुनील दामले, अशोक वारगे आदी उपस्थित होते.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गुढीपाडवा ते आताचा गणेशोत्सव असे सर्व सण सरकारी नियमांत पार पडले. देशातील अनेक प्रमुख देवस्थाने आता खुली करण्यात आली आहेत. केवळ महाराष्ट्रातच देवळांची कुलुपे उघडली नाहीत. दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देणारे सरकार मंदिरे उघडायला परवानगी देत नाही. यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नियम पाळून मंदिरे उघडण्यास सरकारने परवानगी द्यावी.
-अॅड. महेश मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष, भाजप
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सर्वच प्रकारची दुकाने अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली आहेत. अशा वेळी सार्वजनिक प्रार्थना स्थळेच बंद का, असा सवाल महाविकास आघाडी सरकारला माणगावात भाजपतर्फे करण्यात येऊन सर्व प्रार्थना स्थळे खुली करावीत, या प्रमुख मागणीसाठी माणगाव साई मंदिर या ठिकाणी शनिवारी भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या वेळी तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी सांगितले की, राज्यभरातील प्रार्थना स्थळेही आता काही नियम व अटी-शर्ती घालून खुली करण्यात यावीत. बाजारपेठेत आता नागरिकांची गर्दी उसळलेली दिसते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांची मर्यादा सरकारने घालून दिली आहे. यातून सार्वजनिक प्रार्थना स्थळेच का वगळली आहेत. ही प्रार्थना स्थळे सरकारने तत्काळ खुली करावीत.
माणगावात घंटानाद आंदोलनास भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, माजी तालुकाध्यक्ष सुरेंद्र साळी, महिला मोर्चा भाजप तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, माजी अध्यक्ष यशोधरा गोडबोले, महिला मोर्चा शहराध्यक्ष दीपाली जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल गलांडे, शहराध्यक्ष राजू मुंढे, बाबूराव चव्हाण, संजय चव्हाण, संजय सावंत, माणगाव तालुका सरचिटणीस उमेश साटम, माणगाव युवा मोर्चा शहराध्यक्ष राजू तेटगुरे, स्मिता भोईर, उषा महाडिक आदी उपस्थित होते.
कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक प्रार्थना स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी नेरळ आणि कर्जतमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नेरळ येथे श्री कुसुमेश्वर देवस्थान आणि मारुती मंदिर येथे राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर घंटानाद करीत मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. सरकारने मंदिरे उघडावीत यासाठी घंटानाद व आरती करण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, भाजप प्रज्ञा प्रकोष्टचे नितीन कांदळगावकर, भाजप सांस्कृतिक सेलचे बल्लाळ जोशी, मिलिंद साने, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी, महिला मोर्चा अध्यक्ष नीता कवाडकर, नम्रता कांदळगावकर, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, अनिल पटेल, अरुण नायक, शंकलेश गदीया, नरेश कराळे, परशुराम म्हसे, सुशील सुर्वे, संदीप म्हसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खोपोली ः प्रतिनिधी – देशामधील इतर राज्यांत मंदिरे उघडण्याची तेथील सरकारने परवानगी दिली असताना महाराष्ट्रातील आघाडी सरकार मात्र चालढकल करीत असल्याचा आरोप करीत भाजपने शनिवारी सकाळी राज्यभर सरकारचा निषेध करीत घंटानाद आंदोलन केले. खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातही माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंदिरांसमोर आंदोलन करण्यात आले.
दार उघड उद्धवा, दार उघड, अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी देऊन परिसर दणाणून सोडला. या वेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील, शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन सभापती तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, सचिन मोरे, शहर सरचिटणिस हेमंत नांदे, दिलीप पवार, प्रमोद पिंगळे, कृष्णा पाटील, सूर्यकांत देशमुख, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, जिल्हा महिला आघाडी चिटणीस स्नेहल सावंत, शहर अध्यक्षा शोभा काटे, राकेश दबके, गोपाळ बावसकर, संजय म्हात्रे यांच्यासह शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरची खोपोली येथील दत्तमंदिरामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश रेठरेकर, विनया परदेशी, रूपेश मेस्त्री, रसिका शेटे, संपदा भट, संभाजी नाईक, दत्ता मंडोळे, संतोष परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.