Breaking News

तरुणाच्या मृतदेहाचे नऊ तासांनंतर शवविच्छेदन; संशयास्पद मृत्यूच्या शक्यतेने वैद्यकीय अधिकार्‍यांचा नकार

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील कानसळ गावानजीक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक लक्ष्मण पवार (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्याजवळ आढळला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. या तरुणाचा खून अथवा संशयास्पद मृत्यू असण्याच्या शक्यतेने शवविच्छेदन करीत नसल्याचे या वेळी डॉ. खिल्लारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर नऊ तासांनंतर तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

मयत दीपक पवार सध्या राहणार कानसळ आदिवासीवाडी, ता. सुधागड हा सोमवारी (दि. 31) संध्याकाळी कानसळ आदिवासीवाडी येथून घरात कोणास काही न सांगता निघून गेला होता. मंगळवारी (दि. 1) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कानसळ आदिवासीवाडीच्या दक्षिणेस भुईशेत नावाच्या पडीक शेतजमिनीच्या बांधात साठलेल्या पाण्याजवळ हा तरुण मृतावस्थेत आढळला. त्यानंतर पाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सकाळी 9 वाजता जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने दीपक पवारचा मृतदेह नऊ तास प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून होता.

पोलिसांसह नातेवाइकांनी डॉ. खिल्लारे यांना विनंती केली, मात्र तरीही शवविच्छेदन करण्यास त्यांनी नकार देऊन तुम्ही मुंबई येथे जे. जे. किंवा के. इ. एम. येथे मृतदेह घेऊन जा, असे सांगितले. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांना नातेवाइकांकडून माहिती देण्यात आली. यानंतर डॉ. मढवी प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळपाडा येथे जाऊन त्यांनी स्वतः मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, तरुणाचा खून किंवा संशयास्पद मृत्यू झाला असावा असे डॉ. खिल्लारे यांना वाटले. त्यामुळे त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला, मात्र

प्रथमदर्शनी तरुणाचा मृत्यू संशयास्पद वाटत नव्हता. त्यामुळे येथेच शवविच्छेदन करण्यात आले, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले. याबाबत पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. साबळे करीत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply