आमदार मंदा म्हात्रे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
नवी मुंबई : बातमीदार
बीड जिल्ह्यात 30 नववधूंनी हुंडाबळीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात काही समाजकंटक नववधूंचा हुंड्यासाठी छळ करून त्यांच्याकडून सोने व महागड्या गाड्यांसारखी मागणी सर्रास करत आहेत. आज 21व्या शतकातही महाराष्ट्रसारख्या विकसित राज्यात हुंडाबळीसारखे प्रकार घडत आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे. या घटनेतील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असून तसे न केल्यास अशा हेलावून टाकणार्या घटना वारंवार घडत राहतील. एक महिला आमदार म्हणून या पावसाळी अधिवेशनात आत्महत्या केलेल्या नववधू व त्यांच्या कुटुंबीयांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून सदर घटनांवर आळा बसण्याकरिता हुंडाबळीमुळे या 30 नववधूंना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे आमदार म्हात्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.