मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद यांनी बुधवारी (दि. 27) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून, तसेच भगवा देत त्यांचे स्वागत केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेते अंतुले साहेब यांचे ऋणानुबंध, तसेच वेगळी मैत्री होती. हे संबंध आमची पुढील पिढी पक्षीय पातळीवर एकत्र येत अधिक दृढ करीत आहे. नाविद यांनी शिवसेनेत परिवाराप्रमाणे राहावे, अशा शुभेच्छाही ठाकरे यांनी दिल्या. या वेळी शिवसंग्राम पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष उदय आमोणकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या ठिकाणी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह नावेद यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.