Breaking News

वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचा एल्गार

अलिबाग ः प्रतिनिधी

वीज महावितरण कंपनीचे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा शॉक देण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. राज्यातील जनतेचे निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोना महामारीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांच्या माथी मारली जात आहेत. अशा प्रकारची वाढीव वीज बिले सरसकट माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत भाजपतर्फे  संपूर्ण रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 7) आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक ठिकाणी वाढीव वीज बिलांची होळीही करण्यात आली.

नागोठणे ः प्रतिनिधी

ग्राहकांना अंदाजे देण्यात आलेली भरमसाठ रकमेची विद्युत बिले माफ करावीत व तसा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर करण्यात यावा, अन्यथा विद्युत मंडळ तसेच महाराष्ट्र शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्युत वितरण कंपनीला देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन सोमवारी विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांना नागोठणे कार्यालयात देण्यात आले. भाजपच्या राज्य पातळीवरून देण्यात आलेल्या सूचनेनुसार ग्राहकांना देण्यात आलेल्या वारेमाप रकमांच्या विद्युत बिलांविरोधात नागोठणे विभागीय भाजपच्या वतीने नागोठणे कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे रोहे तालुका सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, तालुका उपाध्यक्ष शेखर गोळे, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, ज्येष्ठ नेते सिराज पानसरे, विभागीय सरचिटणीस विठोबा माळी, ज्ञानेश्वर शिर्के, नागोठणे शहर महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे, ज्येष्ठ कार्यकर्ते केदार कुंटे, शहर उपाध्यक्ष गौतम जैन आदी उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीत अनेक महिने लॉकडाऊनच्या विळख्यात येथील नागरिक सापडल्याने नागरिकांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत असताना जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळातसुद्धा अनेक नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात जनतेला भरमसाठ रकमेची विद्युत बिले देण्यात आली असून ती 100 टक्के माफ होण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पेण ः प्रतिनिधी

सरकारच्या वीजबील माफीच्या घोषणा हवेतच विरल्या असून कोरोनाच्या सावटाखाली जगणार्‍या जनतेच्या माथी आघाडी सरकारने वाढीव वीज बिले मारून एक प्रकारे त्यांची चेष्टा करण्याचे काम केले. याविरोधात भाजपतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून पेणमध्ये भाजपतर्फे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या आंदोलनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, गटनेते अनिरुद्ध पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, कामगार आघाडी राज्य सदस्य विनोद शहा, महिला जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष प्राचिता पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, जिल्हा चिटणीस वासुदेव म्हात्रे, भाजप उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, नगरसेवक राजेश म्हात्रे, सुहास पाटील, तेजस्विनी नेने, देवता साकोस्कर, माजी सभापती प्रकाश पाटील, बाळासाहेब जोशी, संजय कडू, सरपंच प्रकाश कदम, भाजप तालुका सरचिटणीस संजय घरत, रूपेश पाटील, रमेश साजेकर, भरत पाटील, अरविंद महाडिक आदींसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी शेडाशी येथील आदिवासी सुरेश पवार यांना पाच महिन्यांचे बिल 45000 आले असल्याचे पत्रकारांना दाखविण्यात आले. अशा अनेक वाढीव वीज बिलांची या वेळी महावितरण कार्यालयासमोर होळी करण्यात आली. तसेच महावितरणाचा कारभार सुव्यवस्थित करण्यात यावा यांसह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हा अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील यांना देण्यात आले.

मुरूड : प्रतिनिधी

वाढीव वीज बिलांविरोधात मुरूड भाजपच्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर सोमवारी (दि. 7) मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. कोरोनामुळे पर्यटनासह अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, तर कामावर असणार्‍या लोकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून एकदम पाच महिन्यांची मोठ्या रकमेची वीज बिले देण्यात आल्याने लोक त्रस्त असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुरूड तालुका भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. या मोर्चात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्स पाळून उभे होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. मोर्चाच्या धसक्याने महावितरणच्या प्रमुख गेटजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी आपले विचार मांडताना तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर म्हणाले की, वाढीव वीज बिलांमुळे लोक हैराण झाले आहेत. महिन्याला ज्या ग्राहकाला सुमारे 700 रुपये बिल येत होते, त्या ग्राहकाला पाच महिन्यांचे सात हजार रुपयांपेक्षा जास्त बिल आले आहे. हा अन्याय आहे. आधीच येथील लोक कोरोना, निसर्ग चक्रीवादळ अशा संटकांनी त्रस्त आहेत. त्यातच वादळानंतर वीजपुरवठा अनेक दिवस खंडित असतानाही जाचक वीज बिले देण्यात आली आहेत. राज्य सरकारने सरसकट वीजमाफी करावी; अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, संघटक चिटणीस प्रवीण बैकर व ललित जैन यांच्या हस्ते महावितरणचे मुरूड येथील उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना वीज बिल माफ करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी येरेकर यांनी आम्ही आपले निवेदन वरिष्ठ कार्यालयात पाठवू, असे सांगितले. या मोर्चाला भाजप शहर अध्यक्ष उमेश माळी, माजी तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, बाळा भगत, सरचिटणीस नरेश वारगे, जीवन सुतार, युवक अध्यक्ष अभिजित पानवलकर, तालुका महिला अध्यक्ष सुचिता घाग, अल्पसंख्याक महिला तालुका अध्यक्ष नसीम उलडे, शैलेश काते, महेश मानकर, नरेंद्र म्हात्रे, केदार गद्रे, सुरेश गिरणेकर आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाड ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात आलेली भरमसाठ वीज बिले सरकारने माफ करावीत, या मागणीसाठी महाड भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत निवेदन सादर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला. अशातच वीज वितरण कंपनीने भरमसाठ बिले आकारून धक्काच दिला. बेरोजगारी व महामारीच्या काळातील वाढीव वीज बिले माफीसाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. महाडमध्येही भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, महेश शिंदे, अनिल मोरे, चंद्रजित पालांडे, भारत विचारे, कुद्रीमोदी, श्वेता ताडफळे, शैलेश बुटाला, गणेश फिलसे आदींनी चांभारखिंड येथी वीज वितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. तसेच उपकार्यकारी अभियंता सी. एस. केंद्रे यांना वीज बिले माफ करण्याचे निवेदन देण्यात आले.

पाली ः प्रतिनिधी  

महावितरण कंपनीचे राज्यात वीज ग्राहकांना वीज बिलांचा शॉक देण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. महावितरणने कुठल्यातरी काल्पनिक गृहितकावर आधारित पाच पट वीज बिले ग्राहकांना पाठविली. कोरोना महामारीच्या काळात भाजपने संयम राखून याबाबत अधिकार्‍यांना भेटून निवेदने दिली. लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. ही समस्या केवळ सुधागड तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा वीज बिलांचा लूटमार पॅटर्न ठाकरे सरकारने राबवला आहे. तो तातडीने थांबवण्यासाठी भाजपच्या वतीने सर्वत्र आंदोलन करण्यात आले.  सुधागडातील त्रस्त वीज ग्राहकांनी याला प्रतिसाद देत झालीच पाहिजे झालीच पाहिजे, वीज दरवाढ कमी झालीच पाहिजे, वीज बिलवाढ रद्द करा, अशा घोषणा देत आंदोलनात सहभाग घेतला. तसेच या वेळी वीज बिलांची होळीही करण्यात आली. आंदोलनाला सुधागड तालुक्यातील पाली येथून सुरुवात करण्यात आली. पक्षाचे रायगड जिल्हा  उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली पाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. उदासीन राज्य सरकार, लुटारू महावितरण कंपनी आणि ग्राहकहिताचे मुख्य उद्दिष्ट विसरलेला वीज आयोग यांनी एकत्रित येऊन ग्राहकांनाच ट्रॅप केले आहे, मात्र या वीज बिलांच्या विळख्यातून ग्राहकांना सोडवल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नसल्याचे रायगड जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी स्पष्ट केले. भरमसाठ वीज बिले तत्काळ रद्द करून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मपारा यांनी केली. या वेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, संघटन सरचिटणीस सागर मोरे, जितू केळकर, सरपंच रोहन दगडे, सरपंच भाऊ कोकरे, महिला मोर्चा अध्यक्ष आरती भातखंडे,  उर्मिला महाले,  कीर्तन देसाई, वैभव देशमुख, नांदगाव विभाग अध्यक्ष चंद्रकांत पठारे, राकेश पठारे, अजय खंडागळे, भाऊ गांधी, वासू मराठे, अरुण साठे, योगिनी भातखंडे, सुहास आपटे यांच्यासह  भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

धाटाव ः प्रतिनिधी

वाढीव व भरमसाठ वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष  अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रोहा नगरपालिकेसमोर विद्युत बिलांची होळी करीत जनआंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या काळात व निसर्ग चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे जनता हैराण झाली असून जवळजवळ 15 दिवस शहरात व ग्रामीण भागात एक ते दीड महिना वीज नव्हती. या संकटातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी या कालावधीतील वीज बिले पूर्णतः माफ करणे तसेच चुकीची वाढीव बिले रद्द करून दुरुस्ती करून पाठवावीत. ग्रामीण भागात अजूनही विजेची कामे झाली नाहीत. ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, यांसह अनेक मागण्यांचे पत्र लिहून संबंधित विद्युत पुरवठा अधिकारी, रोहा तहसीलदार तसेच प्रांत यांना लेखी स्वरूपात अर्ज देण्यात आले. या वेळी भाजपचे युवा अध्यक्ष अमित घाग, राज्य परिषद सदस्य संजय कोनकर,  सरचिटणीस दीपक भगत, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, भाजपचे ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके, श्रद्धा घाग, विलास डाके, नरेश कोकरे, खांब विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव,  श्रीकांत जंगम, जोशी सनलकुमार, आदिवासी जिल्हा अध्यक्ष निमिश वाघमारे यांसह असंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply