Saturday , June 3 2023
Breaking News

हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल -मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुलवामा येथे हल्ला करून दहशतवाद्यांनी मोठी चूक केली असून, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. या हल्ल्यामागच्या शक्ती आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा मिळेल. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. त्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी

(दि. 15) वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी संबोधित करताना ते बोलत होते. शेजारचा देश जी कृत्ये करत आहे, त्याने तो भारतात अस्थिरता निर्माण करण्यात यशस्वी होईल हे स्वप्न त्याने सोडून द्यावे. कारण ते कधीही होणार नाही. आर्थिक अडचणीतून जाणार्‍या या देशाला असे वाटते की अशा प्रकारे भारताला उद्ध्वस्त करता येईल, मात्र हे कधीही शक्य नाही. आमचा मार्ग विकासाचा आहे. या देशातील 130 कोटी जनता या हल्ल्याचे सडेतोड उत्तर देईल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला असे सांगत भारताला पाठिंबा व्यक्त करणार्‍या सर्व देशांचे पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. जगातील दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एक होऊन लढायला हवे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांचे एकमत होईल तेव्हा दहशतवाद एक क्षणही टिकणार नाही, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. आम्ही दहशतवादाचा मुकाबला करीत राहणार आणि कधीही थांबणार नाही. शहिदांनी प्राण त्यागून पहिले देशाचे रक्षण केले आहे. देशाचे रक्षण ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि दुसरे काम आहे देशाची समृद्धी, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

–एकजूट होऊन तोंड देऊ या!

जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. टीका करण्याचा त्यांना हक्क आहेच, मात्र माझी विनंती आहे की ही वेळ अतिशय संवेदनशील आहे. कुणी आमच्या बाजूचे असोत किंवा विरोधात, आपण सगळे राजकारणापासून दूर राहून या हल्ल्याला एकजूट होऊन तोंड देऊ या, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधक आणि समर्थकांना आवाहन केले आहे. आपल्या देशाचा एकच सूर आहे आणि तो सर्व जगात ऐकू

आला पाहिजे. आपली लढाई आपण जिंकण्यासाठी

लढत आहोत, असेही मोदी म्हणाले.

–पाकचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा भारताने काढला असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी (दि. 15) केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संकेतही जेटलींनी दिले. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार आर्थिकदृष्ट्या मागास व्यापारी सहयोगींना देण्यात येतो. भारताने हा दर्जा पाकिस्तान, व्हिएतनाम आणि बांग्लादेश या तीन राष्ट्रांना दिला होता. आता पाककडून हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

–हल्लेखोरांना सोडणार नाही : सीआरपीएफ

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला व दहशतवाद्यांना थेट इशारा दिल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही (सीआरपीएफ) या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा हल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही,’ असा निर्धार सीआरपीएफने व्यक्त केला आहे.

सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारी

(दि. 15) श्रद्धांजली वाहण्यात आली. ट्विटसोबत सीआरपीएफने श्रद्धांजलीपर एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यात या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे सीआरपीएफने ट्विटमध्ये म्हटले आहे.

–शहीद जवानांच्या पार्थिवाला गृहमंत्र्यांनी दिला खांदा

श्रीनगर : वृत्तसंस्था

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. या वेळी सिंह यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदाही दिला. विविध लष्करी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी गृहमंत्र्यांसोबत उपस्थित होते.

–महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण

बुलडाणा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील लखनी प्लॉट येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड या दोन जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply