Breaking News

रोह्यात कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ

नागोठणे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या तालुक्यातच कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयातील 2 सप्टेंबरपासूनचे रुग्णांचे तपासणी अहवाल चार दिवस होऊनही प्राप्त झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. यातील काही रुग्ण अत्यवस्थ आहेत, पण त्यांचे आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट प्राप्त न झाल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास अडचणी येत आहेत.

याबाबत रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अंकिता खैरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही, तर तालुका आरोग्य अधिकार्‍यांचे दोन्ही भ्रमणध्वनी क्रमांक बंद असल्याचे दिसून आले.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात कोरोना टेस्टसाठी उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेची क्षमता प्रतिदिन 375 असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात दररोज वाढणारी रुग्णसंख्या पाचशे ते सातशेच्या दरम्यान आहे. अशावेळी या प्रयोगशाळेची क्षमता वाढविणे गरजेचे होते, पण या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून येत नसल्याने जिल्ह्यात नाराजीचे वातावरण आहे. त्रस्त कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक मात्र एकूणच आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आहेत.

पेणमध्ये कोरोनाचा उद्रेक; गर्दीवर नियंत्रण गरजेचे

पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील जवळजवळ सर्वच गावांत कोरोनाने शिरकाव केला असून, आता एकही गाव कोरोनापासून वंचित राहिलेले नाही, तर तालुक्यात 2500हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, 68 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामुळे तालुका हादरला आहे.

पेण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा झाला आहे की यातून सर्वच सरकारी कार्यालये वाचली नाहीत. बँका, पतसंस्था, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगर परिषद, सरकारी रुग्णालये अशा सर्वच ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने तारांबळ उडाली आहे. याशिवाय खासगी कार्यालये, भाजी मार्केट, दवाखाने येथील कर्मचारी, मच्छी मार्केट व राहत्या सदनिकांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यात 2400हून अधिक कोरोना रुग्ण आढळलेले असले तरी 80 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे 68 जण मृत्युमुखी पडले असल्याने चिंता वाढली आहे.

दररोज शेकडो नागरिक पेण शहरात खरेदीच्या नावाने गर्दी करीत आहेत. यामुळे अनेक माणसे एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने प्रादुर्भावही वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज 50 ते 100च्या आसपास कोरोना रुग्ण तालुक्यात मिळून येत आहेत.

पेणमधील विविध खासगी दवाखान्यांतील डॉक्टर्सनाही कोरोनाची लागण झाल्याने इतर रुग्ण तपासताना अडचणी वाढल्या आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply