Breaking News

पेण अर्बन बँकेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; ठेवीदारांनी वाचला समस्या, तक्रारींचा पाढा

अलिबाग ः प्रतिनिधी

598 कोटींच्या थकीत कर्जांची वसुली करा, जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत द्या, दर महिन्याला झालेल्या कार्यवाहीसाठी नियमित आढावा बैठका घ्या यांसारख्या मागण्या पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. या वेळी ठेवीदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढाच जिल्हा प्रशासनासमोर वाचला. पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक संजय गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मालवे, पेण उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल इनामदार, बँकेचे प्रशासक आणि सनदी लेखापाल यांच्यासह बँकेचे ठेवीदार उपस्थित होते. 2010 साली बँकेवर निर्बंध आले. दहा वर्षे झाली तरी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळू शकलेले नाहीत. बँकेच्या 598 कोटी रुपयांच्या कर्जांची वसुलीही झाली नाही. या थकीत कर्जांची तातडीने वसुली करण्यात यावी तसेच बोगस कर्ज प्रकरणातून खरेदी केलेल्या जागा प्रशासनाने जप्त केल्या आहेत या जागांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे द्या, असे आदेश न्यायालयाने दिले होते, पण चार वर्षांत त्याबाबतही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या जागांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. बँकेच्या एक लाख 98 हजारपैकी फक्त 23 हजार ठेवीदारांना 25 हजारपर्यंतची रक्कम मिळाली आहे. उर्वरित ठेवीदारांनाही त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात यावे, यावरही बैठकीत जोर देण्यात आला.

598 कोटी रुपयांची बोगस कर्जे वितरित झाली आहेत. ही कर्जे वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. ही थकीत कर्जे वसूल करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

-नरेन जाधव, कार्याध्यक्ष,

पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply