उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 9) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
500 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन या अन्नधान्य रुपी वस्तूंचा स्वीकार केला. विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की संपूर्ण जग कोविड महामारीने ग्रासले आहे, अशा या बिकट संकट काळात समाजातील गरीब व गरजू लोकांना अन्नधान्याच्या स्वरूपात केलेली मदत ही लाख मोलाची ठरत आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे या जासई विद्यालयास नेहमीच सहकार्य लाभत आहे. दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप केले जाते. या मदती बद्दल सुरेश पाटील यांनी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे विशेष ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व जासई भाजप अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, शिरीष म्हात्रे, गाव अध्यक्ष यशवंत घरत व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार रुपेश पाटील यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.