दुचाकीचे अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना सध्या पावसाने वाहून आलेल्या रेतींचे प्रमाण दिसू लागले आहे. नवी मुंबईतील अनेक महत्वाच्या शहरांतर्गत रस्त्यांवर रेती पसरलेली आहे. नियमित या मार्गांवरून प्रवास करणार्या नागरिकांना चटकन या रेतीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत. या धोकादायक रेती काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न केले जय नसल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्याचा कालावधी सध्या सुरू आहे. पावसाच्या पाण्यात वाहून आलेली ररेती रस्त्यांवर साठली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने त्यातून खडीसदृश रेती बाहेर आल्याने रस्ते सध्या रेतीमय झाले आहेत. शहरांतर्गत मार्गांवर अनेक भागांत अशाप्रकारे रेती साठल्याने मार्ग बाईकस्वारांसाठी धोकादायक बनले आहेत. नियमित या रस्त्यांवरून वाहने चालवणारे दुचाकीस्वार घसरू लागले आहेत. स्कुटी चालवणार्या अनेक महिलांना देखील धोका संभवतो. सीवूड्समध्ये एक गरोदर महिला स्कुटीवरून जात असताना रस्त्यांच्या मध्यभागी साठलेल्या रेतीवरून पडता पडता वाचली. तर सेक्टर पामबीचवरून सेक्टर 50 येथे वाळल्यावर साठलेल्या रेतीवरून बाईक्सवार घसरल्याने किरकोळ जखमी झाला.
सेक्टर 21 नेरुळ येथे सारस्वत बँकेजवळील स्पीड ब्रेकरला लागून रेती साठली आहे. त्यामुळे स्पीडब्रेकरसाठी ब्रेक लागवताना बाईक्सवार व चारचाकी वाहनांचे टायर्स स्लिप होत असल्याचे चित्र आहे. अशाच पद्धतीने नवी मुंबईतील अनेक भागांत व रस्त्यांवर रेती साठली आहे. रस्त्यावर साठलेल्या रेतीकडे मात्र दुर्लक्ष होत लागल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी सीवूड्समध्ये साठलेल्या रेतीबाबत व पडलेल्या खड्डयांबाबत आयुक्तांची भेट घेतली. अनेक दुचाकीस्वार रेतीवरून घसरू लागल्याचे दिसून येत आहे. खड्डे बुजवताना रस्त्यावर साठलेली रेती काढून टाकणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढेल.
-रणजित नाईक, भाजप युवा मोर्चा