नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्यांना दिसत नाहीत, मात्र देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात, असा टोला मोदी यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
विरोधी पक्ष निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलताहेत. बाहेरून येऊन देशात घुसखोरी करणारे ममता बॅनर्जी यांना कधीच दिसले नाहीत, मात्र राष्ट्रगीत व वंदे मातरम् बोलणारे त्यांना घुसखोर वाटू लागले, असा आरोप मोदी यांनी या वेळी केला.
प. बंगालमध्ये निवडणुकीपेक्षा तिथे झालेल्या हिंसाचाराचीच जास्त चर्चा आहे. आधीच्या पंचायत समिती निवडणुकीतही हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या, याची आठवण मोदी यांनी करून दिली. ममता बॅनर्जी निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
भाजपला 2014च्या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही, असे सांगणारे चुकीचे ठरले. आता तर भाजपला पाचव्या-सहाव्या टप्प्यातच बहुमत मिळाले आहे. प. बंगालमध्ये होणार्या मतदानामुळे आम्ही 300चा आकडा पार करू, असा ठाम विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.