नागरिक त्रस्त; ऑनलाइन शिक्षणावर परिणाम

रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नाही, वारा वादळ नाही तरी सतत वीज जात असल्याने वीज वितरणविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रोहा शहरात दिवसासह रात्रीही वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
आधीच कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक सहसा घराबाहेर पडत नाहीत, तर दुसरीकडे सूर्यनारायण तापत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. लहान मुलांनाही वीज नसल्यामुळे त्रास होत आहे. शालेय शिक्षण ऑनलाइन सुरू असताना वीज गेल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थीही वैतागले आहेत. कोरोनामुळे आधीच व्यापारी हैराण झाले आहेत. त्यात आता वारंवार वीज जात असल्याने काही प्रमाणात सुरू झालेल्या व्यवसायांसमोरही अडचणी निर्माण होत आहेत.
वीज खंडित होण्याचा प्रकार रोहा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिवसभरात तीन-चार वेळा तरी ग्रामीण भागात वीज जाते. मोठ्या रकमेच्या आलेल्या वीज बिलांमुळे नागरिकांतून विद्युत मंडळाविरुद्ध संताप व्यक्त होत असताना आता सतत वीज खंडित होत असल्याने विद्युत मंडळाविरोधातील संताप अजूनच वाढला आहे. वीज मंडळाने वीजसेवा सुधारावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.