Breaking News

श्रीरंग बारणे यांना विजयी करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

खोपोली : प्रतिनिधी

भारतात देशप्रेमी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे, त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कुटुंबाशी दररोज संपर्क करुन महायुतीच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी आणि खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 13) खोपोली येथे केले.

शिवसेना, भाजप व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करीत होते. महायुतीचे नाते म्हणजे देशभक्तीचे नाते आहे, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी असल्याने कार्यकर्त्यांनी आळस झटकून काम केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगीतले.

पालकमंत्री चव्हाण यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर चौफेर टिका करताना या पक्षाकडे देशासाठी कुठलाच जाहीरनामा नसल्याने केवळ मोदींवर टिका करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे असल्याचे सांगितले. मोदी सरकारने तसेच राज्यात फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी, कष्टकर्‍यांसाठी तसेच महिलांसाठी वेगवेगळया कल्याणकारी योजना राबविल्या त्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनमानसात जाऊन सांगितली पाहिजे तरच काँग्रेसचे बिनबुडाचे आरोप जनतेला समजतील असे सांगितले.

पालकमंत्री चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या कार्यप्रणालीवरही जोरदार हल्ला चढवीत राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला सिंचन घोटाळयामुळे रखडलेल्या धरणांची कामे आता युती शासनाच्या कालावधीत पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना विधानसभा संघटक विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनीही  बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मेळाव्याचे सूत्रसंचलन शहर उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी केले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा उपध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील, ज्येष्ठ नेते विनोद साबळे, जिल्हा सरचिटणीस शरद कदम, भाजप तालुका अध्यक्ष बापू घारे, तालुका सरचिटणीस सनी यादव, शहर प्रमुख सुनिल पाटील, भाजप नगरसेवक तुकाराम साबळे, ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील, भाई तावडे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले.

जागतिक पातळीवर मोदींनी भारताला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे, हे विरोधकही मानतात. शेजारचे राष्ट्रही मोदी सत्तेवर येणे महत्वाचे मानते. मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविणे ही काळावी गरज आहे. त्यासाठी खासदारकीच्या निवडणूकीत महायुतीचे आप्पा बारणे यांना विजयी करावे.

-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply