आमदार रविशेठ पाटील यांची केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी
पेण : प्रतिनिधी
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवून पेणसह राज्यातील मूर्तीकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांना आमदार पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेण तालुका हा गणेशमूर्ती बनविण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील हमरापूर विभाग तसेच पेण शहरात पीओपीच्या मूर्तींची निर्मिती दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असते. यातून कारागिरांचा उदरनिर्वाह चालतो. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून पीओपी मूर्तीवर बंदी जाहीर झाली आहे. यंदा कोरोनामुळे सर्वत्र संकट आले असताना गणेशोत्सवावरदेखील अनेक निर्बंध आले. त्यातच पीओपीवर बंदी असल्याने गणेशमूर्ती कारागीरही अडचणीत सापडले होते, परंतु अशी एकदम पीओपी मूर्तींवर बंदी घालू नये अशी विनंती केल्यानंतर एक वर्षासाठी ही बंदी उठविण्यात आली, मात्र पुढे आम्ही काय करायचे हा प्रश्न लाखो कारागीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
रायगड जिल्ह्यात मूर्ती घडविण्याचे पंधरा हजार कारखाने आहेत व तीन लाख कारागीर यावर उदरनिर्वाह करतात, तर महाराष्ट्रातील सुमारे 50 ते 60 लाख कारागीर गणपती कारखान्यांवर अवलंबून आहेत. सरकारची कोणत्याही प्रकारची मदत न घेता लाखो कारागीर आणि त्यांची कुटुंबे वर्षभर गणेशमूर्ती बनवून त्यावर उपजीविका भागवतात. या सर्वांच्या उपजीविकेचे साधन पीओपीवरील बंदीमुळे गेल्यास ते बेरोजगार होतील. त्यामुळे या विषयी तातडीने निर्णय देऊन पीओपीच्या मूर्तींवरील बंदी लवकरात लवकर उठवावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.