पनवेल ः बातमीदार
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची पाहणी सिडकोच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव यांनी केली आहे. सुकापूरमधील 51 धोकादायक इमारतींबाबत दै. ‘राम प्रहर’ने पाठपुरावा केला आहे. सुकापूर ग्रामपंचायतीनेही सिडको व नैनाकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार केला. सुकापूर-पाली देवद येथील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सिडको व अधिकार्यांच्या वारंवार बैठका घेऊनही तसेच वारंवार अधिकार्यांसोबत पत्रपत्रव्यवहार करूनही आजपर्यंत सिडको प्रशासनाने कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही. परिसरातील 51 गृहनिर्माण सोसायट्यांना त्वरित ऑडिट करून रिकाम्या करण्याबाबत नोटिसा दिल्या. त्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. सिडको कुठल्याही प्रकारचे निर्णय घेत नसल्याने दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार व वारंवार याबाबत सूचना देऊनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी केला आहे.