नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने हायअलार्ट जारी केल्यानुसार सोमवारपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत 22 झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात 1 जुलैपासून सुमारे 840 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, धोकादायक वृक्षांची छाटणी आदी मान्सूनपूर्व कामांना वेळेवर सुरुवात झाली होती, परंतु कामाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जूनमध्येदेखील झाडे छाटणीची कामे सुरूच होती. शहारातील अनेक भागात अनेक वृक्ष अद्यापही धोकादायक स्थितीत आहेत. मान्सूनपूर्व कामे करताना छाटणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात शहरात वादळांमुळे 800हून अधिक झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वाहनांचेही नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी ऐरोलीत झाडे कोसळल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पावसाचा जोर वाढल्याने चार दिवसांत 22 झाडे आणि फांद्या तुटण्याचे प्रकार घडले आहेत.