मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरूड समुद्रकिनारा मागील पाच महिने पर्यटकांविना सुनासुना झाला होता. मार्च अखेरीस पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले व संचारबंदी झाल्याने पर्यटक घराबाहेर पडणे बंद झाले. भीतीच्या वातावरणात पूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात दरवषी लाखो पर्यटक येत होते, पण कोरोनाने सर्व उद्ध्वस्त केले. मुरूडचा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पर्यटक मुरूडकडे फिरकले नाहीत. आता मात्र अनलॉकच्या काळात प्रदीघ काळानंतर मुरूड किनार्यावर सकाळी पर्यटक क्रिकेट खेळताना पाहून मुरूडकर सुखावले आहेत. मुरूडचे हॉटेल विनायक किनार्याला लागून असल्याने पर्यटक वाळूत बसून समुद्राकडे पाहत नाश्त्याचा आनंद घेताना दिसत होते. मुरूड शहराला तीन किमी लांब सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारा लाभल्याने हजारो पर्यटक सुरक्षित अंतर ठेवून फिरू शकतात. तसेच मुरूड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने पर्यटकांना फिरण्यासाठी मुरूड हाच सर्वांत सुरक्षित पर्याय ठरत आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेली सर्व हॉटेल्स सॅनिटाइझ तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आली आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेली हॉटेल्स अनेक महिने बंद असल्याने हॉटेल मालकांचे कंबरडे मोडले आहे, मात्र आता पर्यटन पुन्हा सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. रायगड परिसरात सर्वांत जास्त पर्यटक मांडवा मार्गे मुंबईतून येतात, मात्र मागील सहा महिन्यांपासून जलवाहतूक बंद असल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली. सध्या रो-रो सेवा सुरू असली तरी सर्वसामान्य पर्यटकांना ती परवडत नाही. त्यामुळे अन्य बोटींची जलवाहतूक लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.