Breaking News

पर्यटनाला हिरवा कंदील

रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजणार

पाली ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यासह कोकणचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित आहे. रायगड जिल्ह्यात प्रख्यात पर्यटनस्थळे व निसर्गरम्य सागरी किनारे आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत पर्यटन ठप्प झाल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला, मात्र अनेक महिन्यांनी पुन्हा पर्यटनाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता गजबजू लागली आहेत. निसर्गाने भरभरून दिलेले वरदान म्हणून कोकणभूमी ओळखली जाते.

केवळ आंबा, काजू बागायतदार अशी ओळख न राहता गेल्या काही वर्षांपासून कोकणाचा अनेक अंगाने विकास होत आहे. तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात गोवा, केरळप्रमाणेच पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरण्याची पुरेपूर क्षमता आहे. लाखोंना रोजगार देण्याची क्षमता कोकणच्या मातीत आहे. गेल्या काही वर्षांत कोकणातील पर्यटन चांगलेच मूळ धरू लागले. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पर्यटन बंदी करण्यात आली होती. त्यामुळे येथील पर्यटनस्थळे पूर्णतः ठप्प झाली होती.

आता राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने पर्यटन क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुन्हा येथील पर्यटन  खुले झाल्याने पर्यटकांसह व्यापारी, व्यावसायिक, कॉटेजधारक सुखावल्याचे दिसत आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पर्यटनही बंद होते, पण आता सात महिन्यांनंतर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटन खुले करण्यात येत आहे. नागाव ग्रामपंचायतीने पर्यटन खुले करण्यास परवानगी दिली आहे. कॉटेज व्यावसायिकांनीही पर्यटन सुरू होत असल्याने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागावमधील रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरणार आहेत. पर्यटकांची बुकिंगही येऊ लागली आहे. या कोरोनाविषयक सर्व नियम पाळले जाणार आहेत. येथील निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, हिरव्यागार डोंगरदर्‍या, हवामान, खाद्यपदार्थ, लोककला अशा सर्वच अंगाने कोकण समृद्ध असताना पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा मिळाल्यास कोकणचे पर्यटन पुन्हा एकदा नव्याने बहरेल.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply