Breaking News

एकदरात भीषण पाणीटंचाई

आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड शहराच्या अगदी जवळ असणार्‍या एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुमारे 3500 लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने येथील लोकांना काटकसरीने पाणी नियोजन करावे लागत आहे.

एकदाच पाणी मिळत असल्याने लोकांना दूरवरूनसुद्धा पाणी आणावे लागते. स्वतंत्र पाणीपुरवठा लाइन असतानाही एकदरा गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने लोक पाण्याचे सिंचन करतात, तरीही नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकदरा ग्रामपंचायतीकडून वैयक्तिक 100 व सार्वजनिक नळासाठी 50 रुपये आकारले जातात. स्वस्त पाणीपट्टी असूनही अनेक लोक पाणीपट्टी देत नसल्याची बाब समोर येत आहे.

 याबाबत  ग्रामपंचायत  सरपंच  रामकृष्ण आगरकर यांनी सांगितले की, आंबोली धरणातून एकदरा ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा होतो. ही पाइपलाइन खाजण जमिनीतून आल्याने पाइपलाइन लवकर गंजून फुटते. दुरुस्तीसाठी प्लम्बरला बोलवावे लागते. सदर व्यक्ती वेळेवर न मिळाल्यास विलंब होतो. आंबोली येथून पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीस 20 ते 22 हजारांचे वीज बिल भरावे लागत आहे. पाइपलाइन दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी आगरकर यांनी सांगितले. लोकांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकीत ठेवू नये. ग्रामपंचायतीकडे पैसे असतील तर खर्च करता येतील. तरी लोकांनी थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन ग्रामसेवक पी. जी. कारभारी यांनी केले आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply