Breaking News

दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी

दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण-खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता. हा ट्रक या टोळीने गागोदे खिंडीत अडवला. ट्रकचा चालक आणि क्लिनरला मारहाण केली. त्यांचे अपहरण करून दोन तास फिरवले. नंतर मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून घेतली. नंतर डोळ्यावर पट्टी बांधून मुंबई-गोवा महामार्गावर इरवाडी गावाजवळ शेतात सोडून दिले व शेवटी प्लास्टिकचे दाणे असलेल्या गोणी भरलेला ट्रक घेऊन फरार झाले.

या प्रकरणी ट्रकचालकाने पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार भा. दं. वि. कलम 395, 363, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय गुंजाळ यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. तपासासाठी चार पोलीस पथकांची तत्काळ नेमणूक करण्यात आली. ही चार पथक मुंबई, अहमदाबाद, बँगलोर, औरंगाबादच्या दिशेने पाठविण्यात आली. तपासादरम्यान चोरी गेलेला ट्रक हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुयात बेवारस अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. व्ही. कदम यांनी स्थानिकांकडून माहिती काढण्यास सुरवात केली. तेव्हा गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या लाल रंगाच्या झायलोचा सुगावा लागला. ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. यानंतर गुन्ह्याचे पैलू उलगडत गेले.

नाशिक येथून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सदानंद अमृतकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर शाहनशाह उर्फ सेबू गुलहसन (मूळ रा. इलाहबाद उत्तर प्रदेश) यास कुर्ला येथून, महंमद जावीर शरीक शेख राणीगंड उत्तर प्रदेश, हंसराज उर्फ मन्नू मुनेश्वर भिकनापुर उत्तर प्रदेश, महंमद जकीर महंमद इलियास याला अँन्टॉप हिल येथून, तर बंटी उर्फ रोशन सुभा खाबिया याला नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील तीन जण अद्यापही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा जणांना पेण न्यायदंडाधिकारी यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या टोळीने नागपूर येथे चहाची वाहतूक करणारा ट्रक लुटला असल्याचेही तपासात समोर आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply