Monday , January 30 2023
Breaking News

ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार
शिक्षकांच्या व्यथा जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित आहे. शिक्षकांसाठी शिक्षकच उमेदवार हा आमदार झाला पाहिजे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक असल्याने त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी (दि. 24) केले. ते नवी मुंबईत आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन नवी मुंबई भाजपच्या वतीने कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयात करण्यात आले होते. या सभेस संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून शिक्षकवर्ग उपस्थित होता. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप समन्वयक प्रा. वर्षा भोसले यांच्यासह महायुतीचे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिक्षकवर्ग आणि संबंधित घटकांचे प्रश्न सोडवित आहे, असे सांगत आमदार गणेश नाईक यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने एक अभ्यासू व शिक्षकांसाठी अविरत कार्यरत असणारा उमेदवार कोकण विभाग मतदारसंघासाठी आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. ठाणे जिल्हा म्हात्रे यांना विजयासाठी आघाडी मिळवून देईल, अशी खात्रीदेखील त्यांनी दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी, 2017च्या कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा मिळवून विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता, मात्र मागील सहा वर्षे या आमदाराने शिक्षक हिताचे कोणतेच काम केले नाही अशी शिक्षकवर्गाची तक्रार आहे. यंदाच्या निवडणुकीत आम्ही सर्व एकजूट असून शिक्षक असलेला उमेदवारच आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार शिक्षकांनी केलेला आहे. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, अशा भावना व्यक्त केल्या. कोकणामध्ये शिक्षक सेनेला रूजविण्याचे, वाढविण्याचे काम मी केले आहे. त्यामुळे शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते आपल्यासोबतच असल्याचा दावादेखील म्हात्रे यांनी या वेळी केला.
माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी प्रास्ताविकात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जिंकून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे नमूद केले.

शिक्षकवर्गासाठी सदैव कार्यरत -ज्ञानेश्वर म्हात्रे
या वेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, मागील आठ वर्षे सातत्याने शिक्षकवर्गाचे प्रश्न सोडवित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून शाळा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. सुमारे 1100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाल्यावर या संबंधीचा अध्यादेश सरकार काढेल, अशी माहिती त्यांनी दिली. अनुदानानंतरचा सर्वांत महत्त्वाचा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवृत्ती वेतन असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकार या दृष्टीने सकारात्मक आहे. वरिष्ठ शासकीय अधिकारी स्तरावर या विषयाचा अभ्यास सुरू आहे. जुनी पेन्शन योजनादेखील शिक्षकांना लागू होईल, असा विश्वास म्हात्रे यांनी बोलून दाखविला.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply